शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नेवासे रस्त्याच्या दुभाजकामध्ये स्वातंत्र्यदिनी उभारलेला निळा ध्वज आज नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून काढून टाकला. त्यामुळे दलित संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पालिकेतील सत्ताधारी गटाचे सूत्रधार तथा काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांचा निषेध करून पुन्हा बुद्धवंदना करून ध्वजारोहण केले. उद्या (बुधवार) सकाळी १० वाजता आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नेवासे रस्त्यावर हनुमान मंदिर ते बसस्थानकादरम्यान रस्तादुभाजक तयार करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावर दुभाजक तयार करून तेथे वृक्षारोपण यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने संगमनेर व नेवासे रस्त्यावर हे काम हाती घेतले आहे. स्वातंत्र्यदिनी डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील दुभाजकावर दलित संघटनांनी लोखंडी पोलवर निळा ध्वज उभारला होता. आज सकाळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर व नगर अभियंता दळवी यांनी कर्मचा-यांच्या मदतीने ध्वज काढून टाकला. ही घटना श्याम शेळके या दलित कार्यकर्त्याने पाहिली. त्याने काढलेला ध्वज स्वत:च्या ताब्यात घेतला व पुन्हा ध्वज उभारण्याची मागणी केली. तसेच दलित कार्यकर्त्यांना घटनेची कल्पना दिली. या दरम्यान पालिकेच्या अधिका-यांनी विरोधाला घाबरुन पाय काढता घेतला.
काल सोमवारी रात्री पालिकेचे सूत्रधार व माजी आमदार जयंत ससाणे हे नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांच्यासमवेत रस्त्यावरून चालले असताना ध्वज पाहिल्यानंतर त्यांनी तो काढून टाकण्याचा आदेश दिला. त्यानुसार आजची कारवाई झाली असे दलित संघटनांचे म्हणणे आहे. मुख्याधिकारी खांडेकर व दळवी यांचे मोबाईल घटनेनंतर बंद होते.