जलसंपदा विभागाचे नाशिकचे मुख्य अभियंता बी. एच. कुंजीर यांनी कोपरगावचे आमदार अशोक काळे यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या व दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न विभागीय आयुक्तांच्या कार्यकक्षेत असल्याचे स्पष्ट केले.
गोदावरी डाव्या व उजव्या कांलव्यावरील उभ्या असलेल्या ऊस, फळबागा व अन्य पिकांना तातडीने एक, तसेच पिण्याचे पाण्यासाठी आवर्तन सोडावे, या मागणीसाठी आमदार काळे यांचे नेतृत्वाखाली ३५ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळात ज्येष्ठ संचालक लहानुभाऊ नागरे, सोमनाथ चांदगुडे, नारायण मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले,की गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रात खरीप हंगामात जेमतेम पाणी मिळाले. आताही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली दुष्काळी परिस्थितीत दारणा धरणातून पाणी काढले ते २४ तासांत बंद केले. त्यामुळे हजारो क्युसेक पाणी वाया गेले, त्याची जबाबदारी निश्चित करावी, नाशिक महानगरपालिकेचे पिण्याचे पाणी व औद्योगिक  वापराच्या पाण्यात ३५ टक्के पाणी कपात करावी, दारणा, गंगापूर, भरम, भावली, बालदेवी, गौतमी या धरणात साडे आठ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गोदावरी कालव्यावरील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. त्यामुळे कोटय़वधीचे नुकसान होत आहे. साखर कारखान्याचे हंगाम धोक्यात आहेत, त्यासाठी तातडीने पाण्याचे आवर्तन सोडावे अशा मागण्या केल्या. देवगाव सिंचन विभागाचे अभियंता राहाणे यांचेबद्दल मोठय़ा तक्रारी करून त्यांची तातडीने बदली करावी. त्यांनी पाटपाण्यात मोठा गैरव्यवहार केला आहे, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला. कुंजीर म्हणाले की, आहे ते पाणी राखून ठेवले आहे. शेती पाण्याचे एक आवर्तन सोडणे आवश्यक आहे हेही मान्य केले, मात्र पिण्याच्या पाण्यात कपात करून ते शेतीला द्यावे या बाबतचा निर्णय आपल्या कक्षेत नाही माझे कक्षेत नाही. जलसंपदामंत्री सुनील तटकरे व नाशिकचे आयुक्तच हा निर्णय घेऊ शकतात, त्यांचा निर्णय अंतिम राहील हे स्पष्ट केले. या वेळी कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के उपस्थित होते. आमदार काळे यांचे शिष्टमंडळ आयुक्तांनाही भेटले, मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही.