सेनेचा मोठा गट गळाला लागल्यानंतर संपर्कप्रमुखांच्या एकाधिकारशाहीला वैतागलेल्या आणखी काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना मनसेत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेने जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात आले.
उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडय़ात विशेषत: नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व असून नसल्यासारखे होते. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर बोटावर मोजण्याइतक्या त्याच त्याच पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करायचे, एवढाच कार्यक्रम स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे होता. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही. मनसेमध्ये एक प्रकारची मरगळ आली असताना गेल्या आठवडय़ात घडलेल्या पक्षांतराच्या घटनेने मनसेची चर्चा रंगली. सेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख अॅड. दिलीप ठाकूर यांच्यासह डझनभर पदाधिकाऱ्यांना मनसेत खेचून नेत्यांनी शिवसेनेला जोरदार धक्का दिला.
पक्षांतरानंतर सेनेला किती लाभ होईल वा नुकसान होईल हे आगामी काळ ठरवणार असला तरी दिलीप ठाकूर यांचा मनसे प्रवेश निष्ठावंत व जुन्या शिवसनिकांच्या जिव्हारी लागला. शिवसेनेच्या काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना धक्का देण्याच्या उद्देशाने मनसेत गेलेले हे पदाधिकारी सेनेचे आणखी काही पदाधिकारी फोडण्याच्या तयारीला लागले आहेत. लवकरच कंधार-लोहा तालुक्यांतील काही पदाधिकारी, एक जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक मनसेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेतल्या काही पदाधिकाऱ्यांची मानसिकता लक्षात आल्यानंतर पक्षांतर करणाऱ्यांची मनधरणी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आहेत त्यांना थांबविण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत करताना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेतील काही पदाधिकारी फोडता येतील का, यादृष्टीने चाचपणी केली. मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेना सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याची तयारी करण्यात येत असली, तरी सेनेच्या माजी नगरसेवकाने खोडा घातल्याचे कळते. पक्ष सोडून गेलेल्यांचे पक्षात तसेच जनमानसात किती अस्तित्व होते, असा सवाल करून सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेला आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे सांगत मनसेचे काही पदाधिकारी लवकरच दिलसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला. उद्धव व राज या ठाकरे बंधूंच्या पक्षात स्थानिक पातळीवर पक्षांतराचे वारे वाहात आहेत. कोण किती पदाधिकारी पळवतो, याची स्पर्धा लागली की काय असे चित्र आहे. भाजपमध्ये मरगळ, सेना-मनसेमध्ये पक्षांतराची भरती-ओहोटी व राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असे चित्र असताना काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी मात्र आपापल्या परीने पक्षसंघटन वाढवण्यात व्यस्त आहेत.