तुम्ही कधी उलटी मिरची पाहिलीत? उलटी म्हणजे देठ जमिनीकडे आणि टोक आकाशाकडे. मिरचीचे रंग किती? – हिरवा नि लाल असे साधे उत्तर. पण मिरचीचा रंग जांभळा व पिवळाही असतो, असे म्हटले तर? शहरातील केंद्रीय अबकारी विभागाच्या परिसरात सदाशिव दास नावाच्या अभियंत्याने फुलविलेल्या बागेत अशा अनेक अलौकिक गोष्टी पाहावयास मिळतात. मिरचीच नाही, तर फुलांचे काही आगळे नमुनेही संग्रही ठेवले आहेत. हा नजारा पाहून कोणीही थक्क होईल.
तब्बल १०० प्रकारची शेवंतीची फुले, डेलिया या आकर्षक फुलांचे ५० प्रकार संग्रही ठेवता यावेत, या साठी सदाशिव दास दरवर्षी किमान लाखभर रुपये खर्च करतात. सन १९८५मध्ये विवाह झाल्यानंतर दास यांनी बागकामाचा छंद जोपासला. पत्नीला फुलांची झाडे जोपासण्याचा छंद होता. उभयतांनी तो एवढा जपला की, घराच्या छतावरची जागा त्यांना कमी पडू लागली. त्यानंतर त्यांनी कमी जागेत कशी बाग विकसित करायची, याचे प्रयोग केले. आता त्यांची बाग पाहिली की, अनेक अनोख्या गोष्टी पाहावयास मिळतात. कापसाचा रंग पांढरा, एवढेच आपणास माहीत. पण दास यांनी आणलेले कापसाचे बियाणे जांभळ्या, पिवळ्या कापसाचे आहे. एक भोपळा आहे, तो पेंग्विनसारखा दिसतो. एक फूल बदकासारखे दिसते.
फुलांची आवड एवढी की, हा माणूस सतत देश-विदेशातील फुलांचे प्रकार संकेतस्थळावर बघत असतो. प्रदर्शनीय वाटणाऱ्या फुलांचे बियाणे मागवितो. कधी त्यासाठी डॉलरमध्ये पसे खर्च करतो, तर कधी पौंडामध्ये. हौसेला मोल नसते म्हणतात, हे दास यांच्या छंदाकडे पाहिल्यावरच पटते. घरात प्रत्येकाला फुलांचे आकर्षण. मुलांनाही त्यांनी बागकाम शिकविले. आता नोकरीतील एक वर्ष संपले की गावी म्हणजे नागपूरला गेल्यावर फुलांसाठी म्हणून भूखंड विकत घेतल्याचे दास सांगतात. प्रत्येक फुलाची जात कोणती, त्याचे वैशिटय़ काय, हे तर त्यांना तोंडपाठच आहे. पण त्यांना मदत करणाऱ्या सहकाऱ्यालाही आता हे सर्व माहीत आहे.
त्यांच्याकडील एक झाड संगीतावर डोलते. एक झाड किडे-कीटक खाऊन जगते. मोठे गमतीचे आहे ते. एका कुपीसारख्या आकारावर कीटक बसतो, तेव्हा त्यातून रस बाहेर येतो. तो किटकाला मारून टाकतो. एक फुल असे की, त्याचा आकार डायनासोरच्या त्वचेसारखा दिसतो. बीज आणणे आणि ते वाढताना बघणे, हा छंद जोपासताना दास यांच्याकडे एवढी फुले फुलली की, त्यांना औरंगाबादमधील शासकीय निवासस्थानावरील जागा कमी पडू लागली. आता केंद्रीय अबकरी विभागाच्या परिसरात ती ठेवण्यात आली आहेत. आता या फुलांचा बहर ओसरत चालला आहे. पुढच्या वर्षी पुन्हा अशीच बाग फुलविणार त्याचे प्रदर्शन भरविणार, असे दास आवर्जुन सांगतात.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
जांभळी मिरची, बदकफूल, संगीतावर डोलणारे झाड..
तुम्ही कधी उलटी मिरची पाहिलीत? उलटी म्हणजे देठ जमिनीकडे आणि टोक आकाशाकडे. मिरचीचे रंग किती? - हिरवा नि लाल असे साधे उत्तर. पण मिरचीचा रंग जांभळा व पिवळाही असतो, असे म्हटले तर? शहरातील केंद्रीय अबकारी विभागाच्या परिसरात सदाशिव दास नावाच्या …
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-12-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer sadashiv das unique collection