पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासून निकाल जाहीर केल्याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळले असून, २८ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. उत्तरपत्रिकांच्या तपासणीमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी हे उपस्थित होते. अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासल्या असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीमध्ये ही बाब निदर्शनास आली होती. मुळातच अर्धवट तपासण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका पुनर्मूल्यांकन करतानाही न तपासताच विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. अभियांत्रिकी शाखेच्या चारही वर्षांच्या एकूण सत्तर हजार प्रश्नपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज आले होते. त्यापैकी ५ हजार २७८ विद्यार्थ्यांनी छायाप्रत मागितली होती. त्यापैकी १७१ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासण्याबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या संदर्भात डॉ. अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती स्थापण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार तक्रार केलेल्या १७१ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुनर्मूल्यांकनादरम्यान दहा टक्के गुण वाढत असतील, तरच विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल करण्यात येतो.
याबाबत कुलगुरूंनी सांगितले, ‘‘विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल होणे आवश्यक होते, त्यांच्या गुणांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनाही माहिती दिली जात आहे. उत्तरपत्रिकांच्या तपासणीमध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा झाला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रवेश घेतला आहे आणि त्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे, त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी शिक्षकांसाठीही मार्गदर्शक कार्यक्रम आखण्यात येतील.’’दारू पार्टीबाबत चौकशी सुरू
विद्यापीठाच्या आवारात झालेल्या दारू पार्टीबाबत कुलगुरूंनी सांगितले, ‘‘सेवक विहारावर विद्यापीठाचे नियंत्रण नाही. सेवक विहाराबाबत सेवक विहारामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची समिती काम करते. मात्र, दारू पार्टीच्या प्रकारानंतर सेवक विहारावर विद्यापीठाचे नियंत्रण असावे का याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.’’
पुनर्मूल्यांकन प्रकरणात आणखी एकाला अटक
पुणे विद्यापीठातील नापास विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनामध्ये गुण वाढवून दिल्याप्रकरणी सलीम मजीद शेख (वय ४०, रा. कोंढवा) याला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या अकरा झाली आहे. शेख याला डमी रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो पूना कॉलेजमध्ये लिपीक म्हणून काम करतो. तो नापास विद्यार्थ्यांना हेरून असे. त्यांच्याकडून पैसे घेऊन पुनर्मूल्यांकनामध्ये गुण वाढवून देणाऱ्या लोकांची भेट करून देत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत कुलगुरूंनी सांगितले की, पोलिसांनी अटक केलेल्यांना सध्या निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशीही केली जाणार आहे.