राज्यातील प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक्तेनुसार पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याची मान्यता राज्य शासनाने २ जुलै २०१३ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे दिली आहेत. सदरचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
राज्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचे वर्ग पुढे नमूद केलेल्या कार्यपद्धतीने सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण संचालकांमार्फत मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि एक किमी अंतरापर्यंत पाचवीचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये पाचवीचा, ज्या ठिकाणी पहिले ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि एक किमी परिसरात पाचवीचा वर्ग उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या अन्य शाळांमध्ये पाचवीचा वर्ग देण्यात येऊ नये, ज्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे आणि तीन मीटर किमी परिसरांत आठवीचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये आठवीचा वर्ग देण्यात यावा, ज्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे आणि तीन किमी परिसरात त्याच माध्यमाचा आठवीचा वर्ग उपलब्ध आहे अशा शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग देण्यात येऊ नये, अशी कार्यपद्धत शासनाच्या पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू करण्याच्या परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अनुदानित माध्यमिक शाळा, शासकीय आश्रम शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीचे प्रवेश पूर्ण झाल्यामुळे अनेकांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत. विशेषत: ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांतील जव्हार मोखाडा तालुक्यात आठवीचा प्रवेश प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी पालकांना सतावत असून आजही या भागांमधील दीडशेहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषदेच्या व अन्य खासगी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी मोठय़ा संख्यने शिक्षकांच्या जागा रिक्त असणे, वर्ग खोल्या नसणे, आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बीए, बीएड, बीएस्सी पदवीप्राप्त शिक्षकांचा अभाव असल्याने हे वर्ग सुरू करण्यात अडचणी असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.