शहरातील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावर प्रतिबंध झाल्याने व पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने अखेर फटाका विक्रेत्यांनी रस्त्यावरच बाजार भरवला. फटाका विक्रीस सुरक्षिततेची आवश्यकता असतानाही भररस्त्यातच विक्री होत होती. दरम्यान, शनिवारी केलेल्या आंदोलनासंदर्भात कोतवाली पोलिसांनी आमदार अनिल राठोड व इतर १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पूर्वी शहरात भररस्त्यातच धोकादायक पद्धतीने फटाक्यांची विक्री होत असे. ही विक्री दुर्घटनेस कारणही ठरे. परंतु नंतर फटाके विक्रेते संघटित झाले व त्यांनी मोकळे मैदान भाडय़ाने घेऊन, सुरक्षिततेचे नियम पाळून दिवाळी काळात विक्री करणे सुरू केले. शहराबाहेर गोदामेही उभारली. मागील वर्षीही क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावर फटाके विक्रीचे स्टॉल उभारले गेले होते. यंदा मात्र मराठी मिशन ट्रस्ट व बांधकाम व्यावसायिक शरद मुथा यांच्यातील न्यायालयीन वादामुळे व मुथा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने मैदानावर फटाके विक्रीस प्रतिबंध झाला. खरेतर फटाके विक्रीचा व्यवसाय केवळ पाच-सहा दिवसांचाच असतो, त्यामुळे मैदानावर भाडेतत्त्वाने स्टॉल उभारून फटाके विक्रीस परवानगी दिली जावी, अशी विक्रेत्यांची अपेक्षा होती.
मैदानावर स्टॉलला प्रतिबंध झाल्याने विक्रेत्यांनी काल, शनिवारी रात्रीच मैदानाच्या बाजूने रस्त्यावर विक्री सुरू केली. काहींनी शहरातील आपापल्या भागात जाऊन रस्त्यावरच स्टॉल लावले. आज, रविवारी सकाळी मैदानाच्या बाजूने, माळीवाडा, दिल्लीगेट, तोफखाना, चितळे रस्ता भागात विक्रेत्यांनी रस्त्यातच स्टॉल उभारले. नागरिकांनीही फटाके घेण्यासाठी तेथे गर्दी केली होती. त्यामुळे दुपापर्यंत या भागात वाहतुकीची कोंडी होती. काही विक्रेत्यांनी सावेडीतील जॉगिंग पार्कवर स्टॉल उभारले. त्यामुळे आर्थिक नुकसान होणार म्हणून चिंतेने ग्रासलेल्या विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमाव जमवून, जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी आ. राठोड, सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, प्रकाश भागानगरे, फटाका संघटनेचे अनिल टकले, श्रीनिवास बोज्जा आदी १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.