आमदार गोरंटय़ाल यांची माहिती
थेट जायकवाडीवरून पूर्ण केलेल्या योजनेचे पाणी अंबड रस्त्यावरील इंदेवाडी येथील जलकुंभात पोहोचले. येत्या दोनतीन दिवसांत हे पाणी जालना शहरातील घरगुती नळांना येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहे, असे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे व जालना शहराध्यक्ष अब्दुल हफीज या वेळी उपस्थित होते.
आमदार गोरंटय़ाल म्हणाले, की पक्षाच्या जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेऊन जालना शहरातील पाण्याच्या स्थितीची माहिती दिली. येत्या ४ मे रोजी मुख्यमंत्री जालना शहरात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री त्या दिवशी घाणेवाडी तलावास भेट देतील, तसेच नवीन पाणीयोजनेची माहिती घेतील. त्यांच्या हस्ते या योजनेचे औपचारिक उद्घाटन होणार असले, तरी तत्पूर्वी शहरातील घरगुती नळांना पाणी सोडण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. मुख्यमंत्री जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच काही मंत्रीही या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या योजनेचे श्रेय घेण्यावरून शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांसमोर केलेल्या निवेदनावरून गोरंटय़ाल यांनी त्यांच्यावर टीका केली. फुले मार्केट, घनकचरा प्रकल्प, टाऊन हॉल व्यापारी संकुल, राजमहल चित्रमंदिराजवळील पूल, भूमिगत गटार योजना आदी मुद्यांवरून गोरंटय़ाल यांनी आंबेकर यांच्यावर टीका केली.
‘अ‍ॅटम गर्ल’!
शिवसेनेचे बदनापूरचे आमदार संतोष सांबरे यांनी या योजनेतून अंबडला पाणी देण्याबाबत केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करून गोरंटय़ाल यांनी त्यांची संभावना ‘अ‍ॅटम गर्ल’ अशी केली. अंबडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सांबरे तेथील नगरपालिकेत   कधी    गेले  होते, असा सवाल गोरंटय़ाल यांनी केला.