नाटय़ परिषदेची घटना दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे असून अलीकडे नाटय़ परिषदेच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. राजकीय यंत्रणांचा सहभाग चांगला असला तरी चळवळीला पोषक असणे गरजेचे आहे, असे मत माजी नाटय़ परिषद अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे विभागातून उभ्या असलेल्या पाच उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहन जोशी पंढरपुरात आले होते. सोलापूर विभागातून पंढरपूरचे उमेदवार दिलीप कोरके यांना भरघोस मते देऊन परिषदेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी, पंढरपूर नाटय़ परिषद अध्यक्ष विनोद महाडीक, जिल्हा अध्यक्ष कलावंत मंचचे विजय साळुंखे, पंढरपूरचे नटसम्राट विनयमहाराज बडवे, रजनीश कवठेकर, सागर यादव, यतीराज वाळके आदी सदस्य उपस्थित होते.
पंढरपूरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोरके, कोल्हापूरचे प्रफुल्ल महाराज, पुणे येथील दादा पासलकर, सांगलीचे शफी नायकवडी, पुणेचे बाबा कुलकर्णी असे मोहन जोशी यांचे उत्स्फूर्त पॅनलमधून उभे आहेत. एकूण ३८ उमेदवार उभे असून संपूर्ण महाराष्ट्रभर १५ हजार २०० मतदार आहेत, निवडणूक प्रक्रिया चालू झाली असून २० फेब्रुवारी १३ ला निकाल लागणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
नाटय़ परिषदेची निवडणूक प्रक्रियाच चुकीची आहे. सध्याच्या अध्यक्षांनी नाशिक येथे मतदार पत्रिका छापल्या, त्यांचेच लोकांनी भरून सभासदांना पाठवल्या. निवडणूक निकोप स्वच्छ वातावरणात होणे गरजेचे आहे. या करता नवे चेहरे तसेच काही सक्रिय जुने असे उमेदवार आपण उभे केले आहेत, असे मोहन जोशी यांनी सांगितले.
नाटय़ परिषद पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सभासदाना काहीच माहिती मिळत नाही. शासनाने नाटय़परिषदेला ५ कोटी ८० लाख रुपये दिले आहेत. त्या दृष्टीने आराखडा तयार करणे, रंगकर्मी यांचेसाठी कार्यक्रम आखणे, वृद्ध कलावंत यांना पेन्शन वाढवून देणे आदी कामे आहेत. आपला मुख्य अजेंडा नाटय़ चळवळ दिमाखदारपणे उभी करणे, नाटय़ अॅकॅडमी उभारणे आहे. आमच्या ३८ उमेदवारांना पाठिंबा भरघोस मिळत आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.