News Flash

ज्ञान हीच सर्वात मोठी शक्ती -सचिन खेडेकर

केवळ जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी, यश मिळवण्यासाठी अभ्यासाची पुस्तके वाचू नका. त्या पुस्तकांमधील ज्ञान संपादन करा

| January 13, 2015 09:24 am

लोकसत्ता माध्यम प्रायोजक
केवळ जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी, यश मिळवण्यासाठी अभ्यासाची पुस्तके वाचू नका. त्या पुस्तकांमधील ज्ञान संपादन करा. माणसाला यश, अपयश, पैसा अशा अनेक गोष्टी वळणा वळणावर दगा देऊ शकतात. ज्ञान ही एकमेव गोष्ट आहे की जी प्रत्येक माणसाला कधीही दगा न देता यशाच्या शिखराकडे घेऊन जात असते. म्हणून शिक्षण ही मोठी शक्ती आहे. हे प्रत्येकाने ओळखायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी रविवारी येथे केले.
स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ‘रिलायबल अ‍ॅकेडमी’चा वर्धापनदिन, स्पर्धा परीक्षा संमेलन आणि गुणवंतांचा सन्मान असे कार्यक्रम कल्याणमधील नवरंग सभागृह येथे आयोजित केला होता. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, रिझव्‍‌र्ह बँकेचे साहाय्यक महाव्यवस्थापक अरविंद नाईक, माजी विक्रीकर निरीक्षक धनंजय आक्रात, पोलीस निरीक्षक प्रकाश एकबोटे, उपायुक्त धनंजय जाधव, ‘एसीपी’ महेश चिमटे आदी उपस्थित होते.  ‘मराठी माणूस स्पर्धा परीक्षेत उतरण्यापूर्वीच ती परीक्षा किती कठीण आहे याचा विचार करण्यास सुरुवात करतो. तेथेच तो पहिल्यांदा अपयशी ठरतो. हे नकारात्मकपण पहिले मराठी माणसाने काढून टाकले पाहिजे. यशासाठी जशी शिक्षण, ज्ञान याची गरज आहे, त्याच बरोबर आपण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करू शकतो याची तयारी ठेवली पाहिजे. रागावर ताबा ठेवून सदसद्विवेक बुद्धीने वागले पाहिजे. जिभेवर साखर ठेवून जात, धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. ही त्रिसूत्री प्रत्येक माणसाने, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक तरुणाने बाळगली तर यश नक्की आहे, असे खेडेकर यांनी सांगितले.
जगात प्रत्येक गोष्ट माणसाला दगा देते. पण शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे की जी माणसाला यशाच्या पायऱ्या चढवायला शिकवते. यशासाठी अभ्यास करू नका तर ज्ञानासाठी अभ्यास करा, असा सल्ला देत स्वत:चे, गावाचे, देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शेवटी शिक्षण हीच मोठी शक्ती उपयोगी पडणार आहे. याचे भान प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या तरुणांनी ठेवावे. रिलायबल संस्थेने तरुणांना घडवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. शिक्षकांचा प्रभाव घडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असतो. हे घडलेले विद्यार्थी पुढे देशाचे एक पाऊल पुढे नेत असतात, असे सचिन खेडेकर यांनी सांगितले.‘शिक्षणाचा अहंकार येऊ न देता, पालकांचा सांभाळ करून तरुणांनी यशाची शिखरे पादाक्रांत करावीत. शिक्षण ज्या गतीने वाढत आहे. त्या गतीने वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. हे घातक समीकरण समाजाला मागे घेऊन जात आहे. कष्ट, जिद्द, ध्येय हीच यशाची खरी सूत्री आहे. या सूत्रीतून कोणत्याही स्तरातील माणूस जात असेल तर त्याला अवघड असे काहीच नसते. माझा समाज, देश, गाव घडवायचा असेल तर त्यासाठी रस्त्यावर उडी मारण्याची आवश्यकता नाही. आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करा. त्यामधून देश, समाजाची प्रगती होत असते, असा सल्ला प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी तरुणांना दिला. अनेक मान्यवरांची यावेळी व्याख्याने झाली.
मनोहर पाटील यांनी सांगितले, संस्था १५ विद्यार्थी घेऊन सुरू केली आणि त्याचा आता वटवृक्ष तयार झाला आहे. संस्थेत अलीकडे दोन हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाला सुमारे अडीच हजार विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 9:24 am

Web Title: knowledge is one of the largest power says sachin khedekar
टॅग : Loksatta,News,Thane
Next Stories
1 कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आठमाही महसुली उत्पन्न निम्म्यावरच
2 इ गव्हर्नन्सच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर नियंत्रण शक्य -सुरेश प्रभू
3 जॉनी लिव्हरची गंभीर ‘गांधीगिरी’
Just Now!
X