शिल्पा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सोमलवाडा येथील माझ्या स्वत:च्या मालकीचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकेत (कॅनडा) वास्तव्यास असलेले मूळचे नागपूर येथील गृहस्थ चंद्रहास जोग यांनी केला आहे.
चंद्रहास जोग यांनी शिल्पा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सोमलवाडा येथे १९८३ ला दोन भूखंड खरेदी केले. खसरा क्र. ७९/१ मधील २४ व २५ क्रमांक असलेल्या या दोन भूखंडाची विक्री १९८५ला करण्यात आली. बाळासाहेब अग्ने तेव्हा या सोसायटीचे अध्यक्ष होते. २००२ मध्ये चंद्रहास जोग हे नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले. दरम्यान, शिल्पा सोसायटीने नकाशात बदल केला. त्यामुळे जोग यांचा २५ क्रमांकाचा भूखंड वेगळा करून रस्त्याच्या बाजूला दाखवण्यात आला. त्यामुळे पूर्वी लागून असलेल्या दोन्ही भूखंडाची वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी झाली. २०११ मध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आली. दरम्यान, जोग यांनी याप्रकरणी सोसायटीशी संपर्क साधून नवीन नकाशाची मागणी केली. नवीन नकाशा तयार करण्याचे अधिकार सोसायटीला आहे. त्यानुसार बदल करण्यात आले. त्याला सुधार प्रन्यासनेही मंजुरी प्रदान केली. दुरुस्ती पत्रकावर स्वाक्षरी (करेक्शन डीड) कराल तरच माहिती देण्यात येईल, असे सोसायटीचे म्हणणे होते. दरम्यान, माझी मंजुरी न घेता नकाशामध्ये फेरबदल कसे केले, असा जोग यांचा प्रश्न आहे. त्यांच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर शिल्पा सोसायटीचे पदाधिकारी मात्र देऊ शकले नाही.
जोग यांनी या दोन्ही भूखंडाचे सुधार प्रन्यासमध्ये विकास शुल्क भरले आहे. समांतर असलेल्या व प्रति दोन हजार वर्गफूट असलेल्या दोन भूखंडावर घर बांधण्याची माझी योजना होती. या दोन भूखंडामधील एक भूखंड वेगळा केल्याने माझ्या योजनेवर पाणी फेरले गेले आहे. घर बांधायचे झाल्यास दोन ठिकाणी दोन वेगवेगळे घरे बांधावी लागणार आहे. यामुळे माझा खर्चही वाढला आणि मनस्तापही होत आहे. सोसायटीच्या चुकीच्या धोरणामुळे माझे सर्व नियोजनच कोलमडले आहे. याप्रकरणी आपण न्यायालयातही दाद मागणार असल्याचे जोग यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील शेकडो नागरिक विदेशात राहात आहेत. विदेशात काही वर्षे नोकरी, व्यवसाय करून पैसा गोळा करावा. नंतर नागपुरात येऊन व बंगला बांधून उर्वरित आयुष्य मजेत घालवावे, असे या लोकांचे धोरण आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे भूखंड खरेदी केले आहे. परंतु भूखंडमालक विदेशात राहात असल्याचे पाहून भूमाफियांनी असे मोकळे भूखंड बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी केले किंवा त्या भूखंडावर अतिक्रमण करून ते ताब्यात घेतले.

भूखंड तेथेच आहे
सोसायटीने सुरुवातीला तयार केलेल्या नकाशानुसार चंद्रहास जोग यांनी एकमेकाला लागून असलेले दोन भूखंड खरेदी केले. परंतु काही वर्षांंनंतर तांत्रिक अडचणीमुळे मूळ नकाशात फेरबदल करण्यात आला. त्याला सुधार प्रन्यासने मंजुरीही प्रदान केली. त्यामुळे जोग यांच्या एकत्र असलेल्या दोन भूखंडापैकी एक भूखंड वेगळा करण्यात आला. त्यांच्या चतुसीमा बदलवण्यात आल्यात. त्यांचे दोन्ही भूखंड जशेच्या तसे आहेत. भूखंड हडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यांनी आपल्या भूखंडावर संरक्षण भिंत घालावी.
संदीप साबळे , सचिव, शिल्पा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, नागपूर</p>