संसदीय कामकाजातून जनतेचे प्रश्न सोडविले जाऊ शकतात. अनेकदा काही प्रश्नांची उत्तरे सभागृहामार्फत जनतेसमोर आणणे तांत्रिकदृष्टय़ा अडचणीचे असते. अधिकाधिक प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमानेच सोडविले जातात, असे वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रातर्फे दोन परिसंवाद घेण्यात आले. मध्यंतरी ‘कॅग’च्या कामकाजाविषयी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. ‘कॅग’च्या कामाची पद्धत विद्यार्थ्यांना अवगत व्हावी म्हणून विधिमंडळ सदस्यांबरोबर ‘कॅग’चे प्रमुख महालेखाकार-२ यशवंतकुमार यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंत्रालयाचे प्रशासन, विधिमंडळाचे कामकाज, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांची भूमिका आणि प्रक्रियेसंबंधीची माहिती अपर मुख्य सचिव डॉ. एस.के. गोयल यांनी देऊन संसदीय कामकाजाचे महत्त्व विशद केले. जनतेला उत्तरदायित्व स्वीकारताना प्रश्नांची समाधानकारकच उत्तरे आम्ही दिली पाहिजेत या भूमिकेचे गोयल यांनी समर्थन केले. दोन आठवडय़ात दोन कार्यक्रम प्रशिक्षण केंद्राच्यावतीने घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी उभय सभागृहांच्या कामकाजाचे जवळून अवलोकन केले. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्याशी केंद्राने चर्चा घडवून आणली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या पत्रकारांच्या बैठकीत दोन्ही सभागृहातील वृत्तसंकलनाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. या काळात पत्रकारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला. वर्धेतील यशवंत महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विषयाच्या ३० विद्यार्थ्यांनी उभय सभागृहांच्या कामकाजाचे अवलोकन केले व सविस्तर माहिती घेतली. पाचही उपक्रमातून संसदीय लोकशाहीचे महत्त्व, सभागृहाबाहेर विरोधी पक्षांची होणारी आंदोलने, सभागृहाचे कामकाज  विद्यार्थ्यांनी समजून घेतले, हे संसदीय लोकशाहीचे यशच आहे.