स्पर्धा परीक्षांमध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरणाची निर्मिती व्हावी तसेच त्यांचे मनोबल वाढवून त्याग व चिकाटीची भावना निर्माण होईल या दृष्टीने शिक्षकांनी ही जबाबदारी मनापासून स्वीकारण्याची आवश्यकता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी नगर परिषदेच्या वतीने आयोजित गुणगौरव व सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणातून बोलताना व्यक्त केली.
नगर परिषदेच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करून यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी हा कार्यक्रम शनिवारी येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक नगराध्यक्ष अनिल आडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे महत्त्व नगर परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती आरीज बेग यांनी भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ख्वाजाबेग, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे व जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. नगर परिषदेने पुढाकार देत चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बाळासाहेब मुनगीनवार, ख्वाजाबेग व रामजी आडे यांनी कौतुक केले तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिक्षण समितीचे सभापती आरीजबेग यांनी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल, या दृष्टीने दरवर्षी असा कार्यक्रम नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येईल, असा मनोदय यावेळी व्यक्त केला.  कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम झापे यांनी केले, तर आभार नगर परिषेदेचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, उपसभापती विठ्ठल देशमुख, प्रकाश पाटील वानखडे, नगर  परिषदेचे सभापती नगरसेवक तसेच शिक्षक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.