गारखेडा भागातील प्रभाग ८४ मधील नाथ प्रांगणाजवळील कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, महापालिका आयुक्तांसह सभापती व जिल्हा सैनिक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या जागेची पाहणी केली.
उद्यानाचा विकास करण्यासाठी ८ एकर जागा आरक्षित केली आहे. या उद्यानाचा विकास व्हावा, या साठी नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी पाठपुरावा केला. पुणे येथील राज्य सैनिक मंडळाचे संचालक कर्नल सुहास जाटकर यांनी मंडळाचे मेजर सी. व्ही. कुलथे यांच्यासह या जागेची पाहणी केली होती. त्या वेळी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचीही भेट घेतली होती. उद्यानाच्या विकासासंबंधीचा आराखडा लवकर सादर करण्याची तयारी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाखविली. त्यानंतर पालिकेने या जागेच्या सपाटीकरणाचे काम हाती घेतले. सपाटीकरणाचे काम ६०-७० टक्के पूर्ण झाले आहे.
सैनिक पद्धतीने उद्यानाचा विकास केला जाणार आहे. या ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्टचा अनुभव मुलांना घेता येणार आहे. या शिवाय जॉगिंग ट्रॅक, पिकनिकसाठी छोटे उद्यान, वॉर मेमोरिअर ओपन एमपी थिएटर, लेझर शो फोटो गॅलरी देखील विकसित केली जाणार आहे. ही जागा सैनिक कल्याण मंडळाला भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. विकासासाठी ३ कोटी खर्च अपेक्षित असून तीन वर्षांत उद्यान विकसित केले जाईल, अशी अपेक्षा आहे.