गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक कारणांमुळे उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आता समाजातील अनेक संवेदनशील व्यक्ती पुढे येत आहेत. ‘टीजेएसबी’ बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कर्वे यांनी अशा प्रकारच्या एका सोशल नेटवर्किंगद्वारे गेल्या वर्षी ७५ विद्यार्थ्यांना ३४ लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यापुढील शिक्षणासाठी मात्र पैशांची गरज भासते. अशा विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्याचे काम रवींद्र कर्वे गेली पाच वर्षे करीत आहेत.  या शैक्षणिक स्व-मदत गटास आता एका चळवळीचे स्वरूप येऊ लागले आहे. इच्छा असूनही नेमकी कुणाला मदत करायची, हे माहीत नसणारे अनेक दातेही कर्वेच्या या उपक्रमात सहभागी होऊ लागले आहेत.
या उपक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्व शंभर टक्के खर्च शिष्यवृत्ती स्वरूपात दिला जातो. तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एक मार्गदर्शक नेमला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांचा खर्च एका दात्यामार्फत भागविला जातो, पण त्यांचा परस्परांशी परिचय करू दिला जात नाही.
रवींद्र कर्वे या सर्व प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम पाहतात. यंदा प्रथमच या चळवळीतून आठ ते दहा मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. या मदतीसाठी गुणवत्तेशिवाय इतर कोणत्याही अटी-शर्ती नसतात. गेल्या शैक्षणिक वर्षांतील गुणपत्रिकेच्या आधारे पुढील वर्षांची मदत दिली जाते. यंदाही हा उपक्रम राबविला जाणार असून गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांनी तसेच अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन कर्वे यांनी केले आहे.