आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे, हे उद्दिष्ट घेऊन पक्षाची वाटचाल सुरू राहणार आहे. या स्वप्नाला आकार देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच झोकून देऊन जनसंपर्क वाढविला पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पन्हाळा येथे व्यक्त करत पक्षाचे ‘व्हिजन २०१४’ चा पट मांडला. ऐतिहासिक पन्हाळागडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता अभ्यास शिबिर आयोजित केले होते. त्याचा समारोप सायंकाळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भाषणाने झाला. आगामी निवडणुकीमध्ये पक्षाने साध्य करावयाचे उद्दिष्ट आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. अध्यक्षस्थानी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकरराव पिचड होते.    पन्हाळा क्लब येथे झालेल्या शिबिरात दिवसभरात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर, पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार निवेदिता माने आदींची भाषणे झाली.    
राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असताना पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून त्याच्या निवारणासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पवार म्हणाले, दुष्काळाच्या झळा जनतेला बसू नयेत यासाठी शासनपातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पक्षनेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळग्रस्त मदतीच्या अपेक्षेने पाहात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची गरज आहे. शासन दुष्काळग्रस्तांसाठी करीत असलेली मदत आणि त्यांच्या अपेक्षा यामध्ये सुसंवाद घडविण्याचे, त्यांच्यात दुवा बनून राहण्याचे काम कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने केले पाहिजे.    
अध्यक्षीय भाषणात पिचड यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, न घडणाऱ्या गोष्टींचा बाऊ करून विरोधक पक्षाला बदनाम करीत आहेत. त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तर कार्यकर्त्यांकडून दिले गेले पाहिजे. राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येत चालला आहे. पक्षसंघटन अधिक बळकट होण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्कतेने प्रयत्न केले पाहिजेत.    
सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही सावध राहण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, आपले खरे शत्रू भाजप-शिवसेना व मनसे हे पक्ष आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांना शत्रू मानू नये. पण काँग्रेस वरचढ होणार नाही, याकडेही बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.