वाचनाची आवड आहे, पण ग्रंथालयात जाऊन पुस्तके बदलायला वेळ नाहीये, तर अशा मंडळींसाठी आता ऑनलाईन डिजिटल लायब्ररीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.  ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूसाहित्यसंपदाडॉटकॉम’असे या संकेतस्थळाचे नाव आहे.
यासंदर्भात या लायब्ररीच्या अंजली कुलकर्णी यांनी सांगितले की, आमच्या या डिजिटल ऑनलाईन लायब्ररीमध्ये सध्या ८० लेखकांची ८०० हून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. लायब्ररीमध्ये ज्यांची पुस्तके उपलब्ध आहेत, ते लेखक आणि प्रकाशक यांच्याशी आम्ही स्वत:हून संपर्क साधून, त्यांच्याबरोबर रितसर करार करून ही पुस्तके येथे उपलब्ध करून दिली आहेत. पुस्तकांचे ‘कॉपीराईट’ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्याशीही आम्ही बोलणी करून ती तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण केली आहे.
पुस्तके वाचण्यासाठी वाचकांना आमच्या लायब्ररीचे सभासद होणे आवश्यक असून त्यासाठी २०० रुपये शुल्क आहे. तसेच एक पुस्तके वाचण्यासाठी ५ ते ३० रुपये आहे. संपूर्ण पुस्तक फक्त सभासदानाच वाचता येऊ शकते. अन्य साहित्यप्रेमींसाठी आमच्या या संकेतस्थळावर त्या पुस्तकाची चार ते पाच पाने नमूना म्हणून ठेवण्यात आली आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
या ऑनलाईन डिजिटल लायब्ररीत ललित साहित्य, कथा, कादंबरी, नाटक, बाल साहित्य, विनोदी साहित्य आदी विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत. सध्या या लायब्ररीत अनंत मनोहर, गुरुनाथ नाईक, डॉ. मधुसूदन घाणेकर, डॉ. विजया वाड, डॉ. शरदचंद्र गोखले, द. रा. बेंद्रे, ना. धों महानोर, ना.सि. फडके, बाबा भांड, भा. द. खेर, भालचंद्र नेमाडे, मृणालिनी जोगळेकर, वि. आ. बुवा, रा. रं. बोराडे, साने गुरुजी, सी. डी. देशमुख, सुभाष भेंडे, प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष, सुमन भडभडे या मान्यवर लेखकांची तसेच अन्य काही नवीन लेखकांची पुस्तके आहेत. या ऑनलाईन लायब्ररीचे वैशिष्टय़ म्हणजे एकाच वेळी एकच पुस्तक कितीही वाचक वाचू शकतात. वाचकाने एखादे पुस्तक वाचले की त्याच्या खात्यामधून त्याने जे पुस्तक वाचले असेल, त्याचे जे शुल्क असेल ते वजा केले जाते, अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली. ऑनलाईन डिजिटल लायब्ररीत पुस्तके ठेवण्यापूर्वी त्यावर स्कॅनिंग आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच ते अपलोड केले जाते. सध्या मुंंबई, पुणे, सोलापूर, जळगाव तसेच अमेरिका, कॅनडा येथील सभासद असल्याचे त्यांनी सांगितले.  अधिक माहितीसाठी संपर्क (०९४२२२०९४८६)