ऑटोमोबाईल हबच्या जलद विकासासाठी कुशल कामगारांची गरज असून या हबसोबत इतर क्षेत्राचाही विकास शक्य आहे, असे मत ‘अॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये ‘ऑटोमोबाईल हब- आव्हाने व संधी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात उद्योजकांनी व्यक्त केले.
या चर्चासत्रात महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय कार्ला, अशोक लेलॅण्ड लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एस.डी. तिवारी, एमआयए नागपूरचे अध्यक्ष मयंक शुक्ला, व्होल्कसव्ॉगन इंडिया प्रा.लि.चे कार्यकारी संचालक महेश कोडुमुडी, भारत गेअर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरिंदर पी. कँवर, राज्याच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी भाग घेतला. चर्चासत्राच्या प्रारंभी सारंग जोशी यांनी महेंद्राचे सादरीकरण केले. सर्वात जास्त ट्रॅक्टर उत्पादन करणारी ही कंपनी आहे. या कंपनीने नागपुरात १९७४ साली प्रकल्प सुरू केला. विदर्भात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि अशोक लेलॅण्डने  प्रकल्प सुरू केले. हे विकासासाठी सकारात्मक असून ऑटोमोबाईल हबला चांगली संधी आहे. यासाठी सरकार आणि धोरण ठरविणाऱ्यांनी उद्योजकांना सहकार्य करावे, असे शुक्ला म्हणाले.
उद्योग धोरणात सवलती, एक खिडकी योजना, कुशल कामगार, आकर्षक वित्त साह्य़ या बाबी उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आता बाजारपेठेत स्पर्धा वाढली असून आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीने बघतो, असे महेश कोडुमुडी म्हणाले. सरकारने नव्या उद्योग धोरणात बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. कामगारांचे कौशल्य वाढविण्याकडेही सरकार लक्ष देणार आहे, असे मनुकुमार श्रीवास्तव म्हणाले. यावेळी अशोक लेलॅण्ड आणि नागपूर ऑटो अॅण्ड इंजिनिअरिंग क्लस्टर्सचे सादरीकरण  करण्यात आले. २०१३-१४ मध्ये कोलॅबरेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण विकासावर भर देण्यात येत आहे. अशोक लेलॅण्डच्या भंडाराजवळील प्रकल्पामध्ये दीड हजार रोजगार निर्मिती झाली असून हा उद्योग पर्यावरणाच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष देत आहे, असे तिवारी म्हणाले.  या चर्चासत्राचे संचालन केपीएमजीचे संचालक विश्वनाथ भट्टाचार्य यांनी केले.