News Flash

बाजार झेंडू ‘फुल’भाव मात्र ओघळले!

बारा महिने बाजारात मिळत असलेल्या झेंडूला गुढीपाडवा, दसऱ्याला भाव चढतो, मात्र या वेळी हे चित्र पालटले आहे. गेल्या वर्षी २०० रुपये किलोपर्यंत भाव गेलेला झेंडू

| September 30, 2014 06:39 am

बारा महिने बाजारात मिळत असलेल्या झेंडूला गुढीपाडवा, दसऱ्याला भाव चढतो, मात्र या वेळी हे चित्र पालटले आहे. गेल्या वर्षी २०० रुपये किलोपर्यंत भाव गेलेला झेंडू सध्या मात्र २० ते ४० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. येत्या तीन दिवसांत या दरात फार वाढ होण्याची शक्यता नसल्याने दसऱ्याला फुलांचा तोटा राहणार नाही.
गेल्या वर्षीही पाऊस लांबल्याने झेंडूचे उत्पन्न आणि त्यामुळे आवक कमी झाल्याने ग्राहकांनी २०० रुपये किलोने झेंडू विकत घेतला. गणेशोत्सवात झेंडूचे दर १६० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. या वेळी मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्याने झेंडूचे उत्पन्न वाढले आहे. त्यातच पितृपक्षात पंधरवडाभर फुलांची मागणी घटत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातून झेंडू काढला नव्हता. हा सर्व झेंडू नवरात्रीत मुंबईच्या बाजारपेठांमध्ये आला. नवरात्रीत दर दिवशी दादर, भुलेश्वर, बोरिवली अशा शहरांतील लहानमोठय़ा बाजारपेठांमध्ये सुमारे २५ टेम्पो झेंडूची आवक होत आहे. प्रत्येक टेम्पोत साधारणत: साडेतीन ते चार टन झेंडू असतो. म्हणजेच सध्या मुंबईच्या बाजारात ९० ते १०० टन (सुमारे एक लाख किलो) झेंडू येत आहे.
मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने आणि झेंडूची फुले नाशवंत असल्याने व्यापाऱ्यांनी अगदी किरकोळ किमतीत फुले विकायला काढली. त्यामुळे शुक्रवार-शनिवारी दहा ते वीस रुपये किलोने झेंडू विकला जात होता, अशी माहिती मीनाताई ठाकरे मंडईतील व्यापारी मनोज पुंडे यांनी दिली.
दसऱ्याला मुंबईसोबतच पुणे, नाशिकच्या बाजारपेठांमध्येही झेंडूला मोठी मागणी असते. त्यामुळे फुलांची आवक थोडी कमी होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही सध्या ४० रुपये किलो असलेला झेंडू फार तर ५० रुपये किलोपर्यंत जाईल. त्यात फार वाढ होणार नसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

झेंडूचे किरकोळ बाजारातील दर
उत्तम प्रतीचा झेंडू – ४० रुपये किलो
कमी प्रतीचा झेंडू – २० रुपये किलो
उत्तम प्रतीची शेवंती – १२० रुपये किलो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 6:39 am

Web Title: plenty of zendu in flower market in market but prices are still high
Next Stories
1 ठाणे ते सीएसटी ‘डीसी-एसी’ परिवर्तन पूर्ण
2 मुंबईतील मतदारसंघांचा लेखाजोखा..
3 निवडणुकीसाठी मुंबईत ‘१४ कलमी’ बंदोबस्त
Just Now!
X