ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ३० मार्चला सेवाग्राम रेल्वे स्थानकावर सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत ‘रेल रोको’ आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी संघटनेचे नेते जेमिनी कडू व अरविंद माळी करणार असल्याची माहिती बळीराज धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसीची जनगणना करून त्यांना शासन व प्रशासनात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, क्रिमीलेअरची अट रद्द करावी, नोकर भरतीत आरक्षण द्यावे, पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, खासगी उद्योगामध्ये ओबीसींना आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्य़ात कमी केलेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी शेतकऱ्यांना एससी, एसटी शेतकऱ्यांप्रमाणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, या ओबीसी संघटनेच्या नेत्यांच्या मागण्या आहेत. या आंदोलनात विदर्भातील ५० हजार ओबीसी युवक, विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर सहभागी होणार आहे.
यासाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ात बैठका व जाहीर सभा घेतल्या जाणार असल्याचे धोटे यांनी सांगितले. यावेळी सुनील पाल, अरुण पाटील, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरनुले, राजेंद्र लांजेकर उपस्थित होते.