लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लाल कांद्याची या हंगामातील विक्रमी आवक झाली. कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या इतकी वाढली की, समितीच्या प्रवेशद्वारावर वाहने थांबवावी लागली. या दिवशी सुमारे ३० हजार क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी १५५० रुपये भाव मिळाला.
      कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी हंगामातील सर्वोच्च आवक नोंदली गेली. मंगळवारी महाशिवरात्र, बुधवारी अमावस्या आणि गुरुवारी शिवजयंती यामुळे तीन दिवस बाजार बंद राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तत्पुर्वी कांदा विक्रीसाठी बाजारात गर्दी केली. त्याचा परिणाम कांद्याची विक्रमी आवक होण्यात झाल्याचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले. मागील महिन्यात सरासरी १६०० ट्रॅक्टर, जीप व तत्सम वाहनांमधून कांदा बाजारात येत होता. त्यावेळी दैनंदिन सरासरी आवक २० ते २२ हजार क्विंटलपर्यंत होती. सोमवारी त्यात दीड पट वाढ झाली. रविवारी रात्रीपासून जीप, ट्रॅक्टर व अन्य वाहनांमधून कांदा बाजार समितीत आणला जात होता. समितीच्या आवारात वाहनांची गर्दी झाल्यामुळे सकाळपासून अन्य वाहनांना प्रवेशद्वाराबाहेर थांबविण्यात आले. लिलावास सुरुवात झाल्यानंतरही वाहने येत होती. सकाळच्या सत्रात लिलाव झाल्यानंतरही ३५० ट्रॅक्टरमधील कांद्याचे लिलाव होणे बाकी होते. सकाळी १५०० वाहने बाजार समितीच्या आवारात तर २०० वाहने प्रतिक्षेत होती. वाहनांची संख्या दिवसभरात २००० हून अधिक होण्याची शक्यता आहे. कांद्याला सरासरी प्रती क्विंटलला १५५० रुपये सरासरी भाव मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.