रायगडावर मोठय़ा उत्साहात साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रथा राजमाचीवरही रुजविणाऱ्या ‘शिव अस्मिता सामाजिक संस्थे’तर्फे  यंदाही मोठय़ा उत्साहात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. राजमाचीवर साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून शिवप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर लोटणाऱ्या अलोट गर्दीमुळे अनेक नागरिकांना या सोहळ्याचे साक्षीदार होता येत नाही. अनेकांना येथे जाणे शक्य नसते. त्यामुळे रायगडाप्रमाणे इतर गडांवरही हा सोहळा साजरा व्हावा, या हेतूने ठाण्यातील तरुण-तरुणींच्या एका मोठय़ा गटाने शिव अस्मिता सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी राजमाचीवर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आले. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही येत्या ५ ते ७ जून या कालावधीत हा सोहळा साजरा होणार आहे.  
५ जून रोजी आयोजित सामाजिक कार्यक्रमांनी या सोहळ्यास सुरुवात केली जाणार आहे. या वेळी संस्थेच्या वतीने स्थानिक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वह्य़ांचे वाटप केले जाणार असून ग्रामस्थांना मोठय़ा संख्येने सोहळ्यात सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सायंकाळी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळ्याच्या विधीस सुरुवात केली जाणार आहे. सिंधुदुर्ग येथील बऱ्हाडी देवी, कुणकेश्वर, गणपतीपुळे यांसारखी तिर्थक्षेत्रे, तसेच कर्नाळा, सुरगड, लोहगड आणि सिंधुदुर्ग येथील किल्ले आणि मानसरोवर, गंगा, गोदावरी आणि नर्मदा यांसारख्या विविध ठिकाणांहून आणलेल्या पाण्याने शिवरायांचा अभिषेक करून हा सोहळा साजरा केला जाणार आहे. यानंतर पोवाडा, गोंधळ यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी संपूर्ण मंदिराला दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. ७ जून रोजी सकाळी स्थानिक जाणकारांना बरोबर देऊन दुर्गभ्रमंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर सोहळ्याची सांगत होईल. या सोहळ्यासाठी मेहनत घेणाऱ्या संस्थेतील तरुणांना ब्लू व्हेल नेचर्स असोसिएशनचे श्रीराम कोळी आणि इतिहासलेखक दुर्गेश परुळेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. गेल्या वर्षी दीडेशेहून अधिक शिवप्रेमींनी या सोहळ्यास हजेरी लावली होती. यामुळे यंदाही शिवप्रेमींना अधिकाधिक संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क – सिद्धेश ढोकरे – ८०९७९२९६१३, विश्वेश नाईक झ्र् ८०८७३८०९०७