मोबदल्याचा प्रस्ताव जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
एमएमआरडीए व महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूच्या उभारणीसाठी उरण परिसरातील जासई, गव्हाण, चिर्ले आदी परिसरातील जमिनी संपादित करण्यात येणार असून, या जमिनींच्या संपादनापूर्वी शेतकऱ्यांसाठी जनसुनावणी करण्यात येणार आहे. ही जनसुनावणी २४ जून रोजी उरण येथील मेट्रो सेंटर कार्यालयात सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून मोबदल्याचा प्रस्ताव जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे.
मुंबईतील शिवडी ते उरण असा प्रस्ताव असलेल्या या पुलासाठी उरण व पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्याही जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. यामध्ये जासई २८३ खातेदार, गव्हाण-शेलघर २३, चिर्ले १९१ अशा एकूण ४९४ खातेदारांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.
या खातेदारांना भूसंपादन कायद्यानुसार ४ (१)ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी जनसुनावणी करण्यात येणार आहे. यापूर्वी भूसंपादन अधिकाऱ्यांनी दोन वेळा तारीख जाहीर केली होती. मात्र काही कारणास्तव जनसुनावण्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतूसाठी भूसंपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांकडून नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर पुनर्वसन व मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आलेली असल्याची माहिती जासई येथील शेतकरी संषर्घ समितीचे सुरेश पाटील यांनी दिली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय जनसुनावणी होऊ देणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.