विहिंपच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला वाचविण्याकरिता विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रविवारी तिसऱ्या फेरीत बजरंग दलाच्या वतीने तीन ट्रक चारा मराठवाडय़ाकडे रवाना करण्यात आला.
मराठवाडय़ातील भीषण दुष्काळामुळे माणसांप्रमाणे जनावरांचे मोठे हाल होत आहेत. पाणी नसल्यामुळे मराठवाडय़ातील पशुधन मिळेल त्या भावात विकल्या जात आहेत. अनेकांनी तर जनावरे कसायाला विकली. ही गंभीर परिस्थिती पाहून विश्व हिंदू परिषदेने पशुधनाला वाचविण्याकरिता मराठवाडय़ात ११ ठिकाणी भव्य छावण्या उभारल्या आहेत. या छावण्यांमध्ये हजारो जनावरांना मोफत चारा, पाणी व आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या पंधरवाडय़ात खामगावला भेटीकरिता आलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री प्रवीण तोगडिया यांनी या पशुधनाला वाचविण्याकरिता मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बजरंग दलाच्या वतीने पहिल्या फेरीत आठ टन कडबा कुटृी व चारा रवाना करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत उंद्री व चिखली येथून दोन ट्रक चारा देणारे स्वरूपसिंह बोराडे, संदीप पवार, सैनिक लांडे व ट्रकची व्यवस्था करून देणारे बाळूआप्पा तोडकर यांचा बजरंग दलाच्या वतीने शाल व श्रीफ ळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बजरंग दलाचे विभागीय संयोजक अमोल अंधारे, विहिंपचे जिल्हामंत्री बापू करंदीकर, चेतन ठोंबरे, निलेश बरदिया, प्रवीण थोरात, विजय राजनकर, गोलू ठाकूर यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मराठवाडय़ातील पशुधनाकरिता आणखी मोठय़ा प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता असून इतरांनी मदतीकरिता पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.