शिवसेनेने मराठवाडय़ात मदतीसाठी पाठविलेल्या धान्याची एक मालमोटार बीड जिल्ह्य़ात पाठविण्यात आली, तर अन्य मालमोटारीतील धान्य कन्नड, सिल्लोड आणि सोयगावमधील आदिवासींना दिले जाईल, असे गुरुवारी जाहीर करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत धान्य, चारा व पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. ‘ही मदत अपुरी आहे. पण फूल नाही फुलाची पाकळी म्हणून शिवसेना देण्याचा प्रयत्न करते. अन्य कोणाला तरी दोष देण्याआधी मी काय केले, हे सांगण्याचा प्रयत्न असतो’, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठवाडय़ात धान्याची गरज आहे, असे त्रोटक वाक्यही ते म्हणून गेले. ‘लोकसत्ता’मध्ये ‘मराठवाडय़ात दुष्काळ पाण्याचा, पूर धान्याचा’ हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मराठवाडय़ात धान्याची गरज आहे, हे त्यांनी आवर्जून सांगण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर दूरध्वनीवरून वैजापूरला धान्याची मदत केली जात आहे, ती आवर्जून पाहा, असे सांगितले.
शहरातील टीव्ही सेंटर मैदानावर दुष्काळग्रस्तांना चारा, धान्य व पाण्याच्या टाक्यांची मदत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार चंद्रकांत खैरे, ठाण्यावरून धान्य पाठविणारे आमदार एकनाथ शिंदे, मराठवाडय़ातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोचरी टीका केली. गेल्या फेब्रुवारीपासून मराठवाडय़ात पाच वेळा येऊन गेलो. जालना येथे मोठी सभा झाली. त्यानंतर सारे जण हलायला आणि डुलायला लागले, असे सांगत राहुल गांधींच्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, ‘साहेब खूश आहेत. मागून घ्या काय मागायचे ते.’ राहुल गांधींचे हे म्हणणे म्हणजे ‘मोगॅम्बो खूश हुआ’ असे म्हटल्यासारखे आहे. दुष्काळ पडल्यानंतर वीजबिल माफ करा, असे म्हणालो होतो. विद्यार्थ्यांची फी माफ करा, अशीही मागणी केली होती. मात्र, दोन्हीही मागण्या मान्य झाल्या नाही. या सरकारमधील संवेदनशीलता हरविलेली असल्याचे ठाकरे म्हणाले. नुसता आत्मक्लेश म्हणून चालत नाही. अनवाणी पायाने पाणी आणताना किती कष्ट पडतात, हे ज्यांना कळते त्यांना विचारा आत्मक्लेश म्हणजे काय? त्यांनी केलेले आत्मक्लेश म्हणजे थोतांड, अशी टीका ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. फळबागा सुकून गेल्या आहेत. मदतीचे आकडे कागदावर आहेत. प्रत्यक्ष मदत कोणाला मिळाली, हेच आता शोधावे लागणार आहे की कागदावरचे पैसेही ७० हजार कोटीत गेले, असेही ते म्हणाले. दुष्काळग्रस्तांची सरकारने क्रूर थट्टा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील रेसकोर्सच्या मुद्दय़ावरही ते बोलले. शिवसेना घोडेवाल्यांच्या बाजूने नाही, तर सर्वसामान्य माणसांच्या बाजूने आहे. तेथे उद्यान होईल. त्याचे संकल्पचित्रही उद्या येणार आहे. मुंबईतील मोकळ्या जागेचा सामान्यांना उपयोग होईल. या कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांना केवळ शिवसेनेनेच मदत केल्याचा उल्लेख आवर्जून केला जात होता. कार्यक्रमास आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, संजय शिरसाट, आर. एम. वाणी, ओम राजेनिंबाळकर, ज्ञानराज चौगुले यांसह अर्जुन खोतकर, लक्ष्मण वडले आदी उपस्थित होते.