स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आदिवासी वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून उपेक्षितच राहिला असल्याची खंत आमदार शोभा फडणवीस यांनी व्यक्त केली. तिसऱ्या विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. आदिवासींच्या विविध विषयांवर व मुख्य समस्यांवर चर्चा होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत आमदार शोभा फडणवीस यांनी व्यक्त केले.
 सरदार पटेल महाविद्यालयात तिसऱ्या विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार शोभा फडणवीस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सवरेदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. कऱ्हाडे, प्राचार्य डॉ. जे. ए. शेख, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. बी. साठे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार फडणवीस यांनी शासनाचे आदिवासी संदर्भातील धोरण व अंदाजपत्रकात तरतुदी याविषयी आकडेवारीसह अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थितांसमोर मांडले.
या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन आदिवासींना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. विनायक इरपाते यांनी विविध विषयांचे अधिवेशन आणि परिषदांचे आयोजन करीत असल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. शांताराम पोटदुखे यांनी आदिवासींच्या अभ्यासाकरिता गोंडवाना विद्यापीठाने संशोधन केंद्र काढावे की ज्यातून आदिवासींच्या लोककला, संस्कृती समाजासमोर येतील, असे आग्रही प्रतिपादन केले. हे अधिवेशन यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. अधिवेशनाच्या निमित्ताने आश्रू जाधव यांच्या महापुरुषांचे वैचारिक अधिष्ठान पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. ए. शेख यांनी केले. संचालन डॉ. पद्मरेखा धनकर-वानखेडे यांनी, तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. बी. साठे यांनी केले. अधिवेशनाला संपूर्ण महराष्ट्रातून प्रतिनिधी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.