दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अमरावती जिल्ह्य़ात पुन्हा दमदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात २० मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारीही सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात पिकांना नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. मेळघाटातील दुर्गम भागात पावसामुळे पेरण्याच रखडल्या आहेत आणि आता अतिपावसामुळे पिके धोक्यात आली आहेत.
अमरावती शहराला सोमवारी रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. तासभराच्या पावसानेच अंबानाल्याला पूर आला. काही सखल भागात पाणी शिरले. या पावसामुळे मालमत्तेच्या मोठय़ा नुकसानीचे वृत्त नसले, तरी नाल्याच्या काठावर राहणाऱ्या रहिवाशांची तारांबळ उडाली. सकाळपर्यंत शहरात ३० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासात जिल्ह्य़ात सर्वाधिक ४०.४ मि.मी. पावसाची नोंद अंजनगाव सुर्जी तालुक्यात झाली. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्य़ात ५५६ मि.मी. म्हणजे सरासरीच्या १५९ टक्के पाऊस झाला आहे. गेले काही दिवस पावसाने विश्रांती दिली होती. पावसाच्या हलक्या सरी आणि सूर्यप्रकाशाचा खेळ सुरू असल्याने पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. गेल्या २३ दिवसांमध्ये जिल्ह्य़ात पावसाने तब्बल १७ दिवस हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्य़ात ९० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील काही भागात सततच्या पावसामुळे शेतकरी शेतांमध्येच पोहोचू शकलेले नाहीत, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. ज्या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे आटोपली त्या पिकांना आता अतिपावसाचा धोका निर्माण झाला आहे. रोगांचा प्रादुर्भावही जाणवू लागला आहे. सध्याच दुबार पेरणीचे संकट ओढवलेले नसले, तरी जास्त पाऊस पिकांसाठी हानीकारक ठरू शकतो, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुगाच्या पिकांना जास्त पावसाचा फटका बसू शकतो, असे सांगण्यात आले आहे.
सर्व सिंचन प्रकल्प तुडूंब
अमरावती जिल्ह्य़ातील अप्पर वर्धा या मोठय़ा धरणांसह सर्व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा ७० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणांमधून जादा पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून अप्पर वर्धा प्रकल्पाची दारे खुले केले आहे. सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा ४४४.६८ दलघमी म्हणजे ७८.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाण्याची पातळी ३४१.१० मीटरवर आली आहे. मध्यम प्रकल्पांपैकी शहानूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सापन या सर्व चारही प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाल्याने या धरणांमधून सध्या पाणी सोडले जात आहे. चारही धरणांचे दोन दरवाजे खुले करण्यात आले आहेत. शहानूर प्रकल्प ७०.५७ टक्के, चंद्रभागा ७६.९० टक्के, पूर्णा ७३.८८ टक्के आणि सापन प्रकल्प ७२.४६ टक्के भरला आहे. शहानूर प्रकल्पातून ९.९२ घनमीटर प्रतीसेकंद, चंद्रभागामधून ८.६६, पुर्णेतून १५.६४ तर सापन प्रकल्पातून १५.५४ घनमीटर प्रती सेकंद वेगाने पाणी सोडले जात आहे. या नद्यांच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
अमरावती जिल्ह्य़ाला पावसाचा पुन्हा तडाखा
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अमरावती जिल्ह्य़ात पुन्हा दमदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात २० मि.मी. पावसाची नोंद झाली.
First published on: 24-07-2013 at 09:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trashing rain resumes in amravati