लोकसभा निवडणुकीत झालेला मतदार याद्याचा झालेला घोळ, मतदार यादीत नाव नसणे आणि ठिकाण बदलण्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने त्यात सुधारणा केली असली तरी अनेक लोकांना मतदार यादीत नाव नसल्यामुळे किंवा नावे चुकीचे आल्यामुळे मतदान करता आले नाही.
शहरातील विविध भागातील मतदान केंद्रावर फेरफटका मारला असता अनेकांजवळ ओळखपत्र होते मात्र मतदार यादीत नाव नव्हते. मोमीनपुरा भागातील एका मतदान केंद्रावर ओळखपत्र होते मात्र नाव नव्हते तर गणेशपेठ भागात राहणारे मधुकर गडेकर आणि त्यांच्या मुलाचे नाव मतदार यादीत नव्हते त्यामुळे त्यांना मतदानापासून मुकावे लागले. जुना फुटाळा तलाव परिसरातील अनेक मतदारांची नावे रवीनगरमध्ये असल्यामुळे अनेक मतदारांना ४ किमी जाऊन मतदान करावे लागले. अनेकांनी ऑन लाईन नावाची नोंद केल्यानंतर त्याचे ओळखपत्र घरपोच आले मात्र बुथवर नाव नसल्याच्या तक्रारी अनेक मतदान केंद्रावर बघायला मिळाल्या. विशेषत नरे्ंद्रनगर, रामनगर, नंदनवन, ईश्वरनगर, सुयोगनगर या भागात मतदार याद्यामध्ये नाव नसल्याच्या तक्रारी बघायला मिळाल्या. अनेक ठिकाणी मतदार दोन ते तीन वेळा मतदार याद्या तपासून पाहिल्यावर नाव न आढळल्याने निराश होऊन घरी परतत होते. तर अनेक मतदारांकडे ओळखपत्र असून मतदार याद्यांमध्ये त्यांच्या नावापुढे कुण्या दुसऱ्याचे छायाचित्र असल्याने बुथवरील अधिकाऱ्यांनी मतदान करू दिले नाही. तर अनेक मतदारांना त्यांचे नाव आणि आडनावात फरक असल्याने मतदान करता आले नाही. यामुळे अनेक नागरिकांमध्ये रोष दिसून आला. विशेष म्हणजे मध्य नागपुरातील अनेक भागात बोहरा समाजातील मुस्लिम लोकवस्ती अधिक आहे. तसेच या समुदायाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची आडनावे समुदायातील इतर नागरिकांपेक्षा वेगळी असतात. पण, मतदार याद्यांमध्ये नाव बरोबर आणि आडनावात बदल असल्यानेही अनेकांना मतदानाला मुकावे लागले. दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील परांजपे शाळेत ८६ वर्षीय शंकरनारायण शेषाद्री अय्यर या वृद्धाच्या नावाची फोड करून शंकर नारायण अय्यर असे ओळखपत्रात नमूद करण्यात आले होते. त्यांनाही मतदान करता आले नाही.