ठाणे शहरातील सर्व हरित क्षेत्रातील (ग्रीन झोन) विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) रहिवाशी विभागाप्रमाणे वितरित करण्याचा निर्णय घेत हरित पट्टय़ांना सोन्याची झळाळी मिळवून देण्याचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव एकीकडे चर्चेत असतानाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाणेकडील बाजूस असलेला सुमारे ३० एकरचा हरित पट्टा यापुढे रहिवाशांसाठी खुला करण्याचा नवा प्रस्ताव आयुक्त असीम गुप्ता यांनी तयार केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला बोरिवलीकडील बाजूस अधिकृत प्रवेशद्वार असून ठाण्याकडे चितळसर मानपाडा पट्टय़ात असेच एक प्रवेशद्वार देण्यात आले आहे. महापालिकेच्या नव्या प्रस्तावानुसार लोकमान्यनगर पाडा क्रमांक-४ येथून या उद्यानाला आणखी एक प्रवेशद्वार उभारावे, अशी विनंती वन विभागाकडे करण्यात आली असून ३० एकरच्या हरित पट्टय़ात एखादे ‘थीम पार्क’ विकसित करता येईल का, याची चाचपणी उद्यान विभागाने सुरू केली आहे. महापालिकेचा हा प्रस्ताव वन विभागाने मान्य केल्यास संजय गांधी उद्यानात ठाण्याकडून दोन ठिकाणांहून अधिकृत प्रवेश करणे शक्य होणार आहे. यापूर्वी येऊरच्या हिरव्यागार डोंगरांवर हॉटेल, क्लब हाऊस उभारण्यासाठी वाढीव चटईक्षेत्र अनुज्ञेय करावे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातील हिरव्या पट्टय़ाचा पुरेपूर वापर करण्याचा हा नवा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा यासारख्या भागातील हरित पट्टय़ांमध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळे यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे तसेच चाळी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणापासून मुक्त असलेले हरित पट्टे यापुढे संरक्षित करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू असून यासाठी या पट्टय़ांमधील जमीन मालकांना शहरातील इतर भागांप्रमाणे टीडीआर देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कासारवडवली, दिवा-दातिवली, येऊर अशा भागांत मोठय़ा प्रमाणावर हरित पट्टे आहेत. पश्चिमेकडील बाजूस संजय गांधी उद्यानाचे घनदाट जंगल असून या जंगलाच्या पायथ्यापर्यंत झोपडय़ांचे सम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त असलेले जंगल संरक्षित करण्याच्या हालचालींना वेग आला असून त्याचाच एक भाग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथे अंदाजे ११८ एकर जागा वनक्षेत्रासाठी राखीव असून यापैकी ३० एकर जागा नव्या उद्यानासाठी विकसित करण्याची परवानगी द्या, असे महापालिकेचे म्हणणे आहे. संजय गांधी उद्यानात बोरिवली बाजूस अधिकृत प्रवेशद्वार असून नागरिकांना नैसर्गिक पर्यावरण पाहण्यास तसेच जैविक विविधता अनुभवण्याची संधी तेथून देण्यात येते. लोकमान्यनगर येथे संजय गांधी उद्यानात आणखी एक उद्यान विकसित करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेने वन विभागापुढे ठेवला आहे. या ठिकाणी नैसर्गिक पायवाटा, जैविक विविधता, वनस्पतींची लागवड, जॉिगगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. लोकमान्यनगर भागात अधिकृत प्रवेशद्वार उभारल्यास ठाण्यातून संजय गांधी उद्यानात प्रवेश करण्यासाठी दोन मार्गीका उपलब्ध होऊ शकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2014 रोजी प्रकाशित
संजय गांधी उद्यानात ३० एकरचे नवे उद्यान!
ठाणे शहरातील सर्व हरित क्षेत्रातील (ग्रीन झोन) विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) रहिवाशी विभागाप्रमाणे वितरित करण्याचा निर्णय घेत हरित पट्टय़ांना सोन्याची
First published on: 28-03-2014 at 06:32 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 acre new park in sanjay gandhi park