साता-यात स्वाईन फ्लूने चौघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्य़ातील पावसाळी हवामानामुळे स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण आहे. फलटण, खटाव, पाटण, माण, महाबळेश्वर, वाई तालुक्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकात घबराट पसरली आहे.

सातारा जिल्ह्य़ातील पावसाळी हवामानामुळे स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण आहे. फलटण, खटाव, पाटण, माण, महाबळेश्वर, वाई तालुक्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकात घबराट पसरली आहे. चार दिवसात चारजणांना स्वाईन फ्लूने प्राण गमवावे लागले.
मागील दोन दिवसात महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड येथील संजय विष्णू  पवार (वय ३५) या वारकऱ्याचा वारीहून आल्यानंतर स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. ज्योती रवींद्रकुमार रॉय (वय २०, रा. जांब, ता. वाई) व आशा उमेश जाधव  (वय ३० रा. खोकडे, ता. माण) या दोन महिलांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. याशिवाय फलटण तालुक्यातही एकाचे या आजाराने मृत्यू झाला आहे, त्याचे नाव समजू शकले नाही.
मरण पावलेल्या रुग्णातील संजय पवार यांना सुरुवातीला पाचगणीला, नंतर वाईला व पुढे पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते, तर ज्योती रॉय व आशा जाधव यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशाचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. या दोघींमध्येही स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली.
स्वाईन फ्लूमुळे नागरिकात घबराट पसरली असून जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सर्व आरोग्य केंद्र, आरोग्य पथकांवर अशा प्रकारचे रुग्ण शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
फलटण येथे स्वाईन फ्लू बरोबरच डेंग्यूचेही संशयीत रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खात्याबरोबर खासगी आरोग्य सेवेद्वारे रुग्ण शोधण्यात येत आहेत. पावसाळी वातावरणामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील तीन वर्षांत जिल्ह्य़ात पन्नास रुग्ण स्वाईन फ्लूने दगावले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 4 died due to swine flu in satara

ताज्या बातम्या