धान्य ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यात एकूण ४८ गोदामे बांधली जाणार असून पहिल्या टप्प्यात त्यावर ४ कोटी ८० लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली असून प्रत्येक गोदामांसाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात विदर्भातील २१ गोदामांचा समावेश असून त्यावर २ कोटी १० लाख खर्च केले जाणार आहेत.
अन्नधान्य ठेवण्यासाठी राज्यात गोदामांची संख्या अपुरी असल्याने राज्य सरकारने नवीन गोदामे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यात एकूण ४८ गोदामे बांधण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने २०१२-१३ मध्येच मंजुरी दिली होती, परंतु बांधकामासाठी निधीच मात्र उपलब्ध करून दिलेला नव्हता. हा निधी नुकताच उपलब्ध करून दिल्याने या गोदामांच्या बांधकामास लवकरच प्रारंभ होणार आहे. राज्यात सर्वात मोठे ४ कोटी ६ लाख ४९ हजार ४०० रुपये खर्चाचे गोदाम ठाणे येथील चिखले (ता. डहाणू) येथे बांधण्यात येणार आहे. यानंतर बीड जिल्ह्य़ातील शिरूर येथे २ कोटी ३५ लाख ४९ हजार ७७२ रुपये खर्चाचे, नागपूर जिल्ह्य़ातील देवलामेटी येथे २ कोटी ७८ लाख ८० हजार ४५५ कोटी रुपये खर्चाचे आणि २ कोटी १० लाख ५५ हजार ४८० रुपये खर्चाचे गोदाम यवतमाळ येथे बांधली जाणार आहेत.
विदर्भात एकूण २१ ठिकाणी गोदामे बांधली जाणार असून त्यात नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड, रामटेक, चानकापूर (सावनेर), देवलामेटी, काटोल आणि नरखेड, गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा, अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव-रेल्वे, यवतमाळ जिल्ह्य़ातील यवतमाळ, मारेगाव, आर्णी, दिग्रस आणि राळेगाव, बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार, सिंदखेडराजा, अकोला जिल्ह्य़ातील मूर्तीजापूर, बार्शीटाकळी, पातूर, वाशिम जिल्ह्य़ातील वाशिम, कारंजा आणि मालेगाव यांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड येथील गोदामासाठी १ कोटी ६६ लाख ५३ लाख ९०१ रुपये, रामटेक येथील गोदामासाठी २ कोटी १९ लाख ८ हजार ५९३ रुपये, चानकापूर येथील गोदामासाठी १ कोटी १५ लाख ५५ हजार ३२१ रुपये, काटोल येथील गोदामासाठी ९९ लाख ५५ हजार ३९६ रुपये, नरखेड येथील गोदामासाठी १ कोटी ६ लाख ५५ हजार ३९६ रुपयाच्या खर्चास मंजुरी दिली आहे. या गोदामांच्या बांधकामासाठी सध्या प्रत्येकी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाणार आहे.
मराठवाडय़ातील लातूर जिल्ह्य़ातील रेणापूर, अहमदपूर, लातूर (नांदेड रोड), टाका (ता. औसा) येथे, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उस्मानाबाद, लोहारा व तुळजापूर येथील गोदामांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
संपूर्ण राज्यात ४८ गोदामे बांधणार
धान्य ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यात एकूण ४८ गोदामे बांधली जाणार असून पहिल्या टप्प्यात त्यावर ४ कोटी ८० लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
First published on: 21-01-2014 at 09:00 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 warehouse assembling in the entire state 21 warehouse in vidarbh