रेल्वे स्थानकात लोहमार्ग ओलांडणे धोक्याचे असल्याची वारंवार उद्घोषणा करूनही रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाते. पण या नियमाची अंमलबजावणी करताना यंत्रणेकडून भेदभाव करण्यात येत असल्याचे दिसून येते. मनमाड रेल्वे स्थानकात रुळांवर खुर्ची टाकून बसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी केली आहे. यासंदर्भात रेल्वे सुरक्षा दल निरीक्षक व लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
मागील आठवडय़ात येथील रेल्वे स्थानकाजवळील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयामागे असलेली व जीर्ण झालेली पाण्याची टाकी सुरक्षितपणे पाडून टाकण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले होते. या कामाला वेळ लागणार असल्याने रेल्वे आणि महसूल अधिकाऱ्यांनी चक्क फलाट क्रमांक एकसमोरील रेल्वे मार्गात खुर्ची टाकून बैठक मांडली. या कामावर देखरेख करण्यासाठी इतरही अनेक जागा उपलब्ध होत्या. पण अधिकाऱ्यांनी चक्क रेल्वे रुळांची निवड केल्याने काही जणांनी ही बाब हेरली.
या सर्व व्यक्तींवर रेल्वे रूळ ओलांडणे, त्यावर बसणे आदी स्वरूपाचे गुन्हे त्वरित दाखल करण्याची मागणी पांडे यांनी केली. रेल्वे स्थानकात सर्वसामान्य प्रवाशांनी जर असे कृत्य केल्यास  त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते. मग या शासकीय अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, तसेच या दिवशी रेल्वे सुरक्षा दलाचे जे कर्मचारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाईची मागणी पांडे यांनी केली.