महाबळेश्वर येथील लंॅडविक पॉईंटवर पर्यटनास आलेल्या पुण्यातील पर्यटकांना स्थानिकांनी मारहाण केल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.
पुणे येथील १० कामगार टेम्पोतून पर्यटनासाठी महाबळेश्वर येथे आले होते. दुपारी चारच्या दरम्यान लंॅडविक पॉईंटवर ते फिरावयास गेले. तेथेच  त्यांनी स्वयंपाक केला. स्वयंपाक करताना त्यांच्याकडील स्टोव्ह बिघडल्याने त्यांनी शेजारी बंद असलेल्या चहाच्या टपरीतील स्टोव्ह आणून स्वयंपाक केला. जेवण करून स्टोव्ह पुन्हा चहाच्या टपरीत ठेवला. मात्र पर्यटकांनी चहाच्या गाडय़ाची मोडतोड केल्याची चुकीची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यामुळे गैरसमजातून त्यांनी लाकडी काठय़ा, दांडकी घेऊन या कामगारांना मारहाण केली. यात दोन जण जखमी झाले, तर मारहाणीला भिऊन पळून जात असताना एक जण दहा-पंधरा फूट खड्डय़ात पडून गंभीर जखमी झाला. त्याला पुण्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना कळताच पाचगणीचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी धाव घेऊन स्थानिकांवर गुन्हा दाखल केला आहे.