कामावरून एक-दीड तास आधीच घरी पळणाऱ्या सफाई कामगारांना ‘सी’ विभाग कार्यालयाने चाप लावला आहे. विश्रांतीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा हजेरी घेऊन कामगारांना ‘समूह सफाई’ सक्तीची करण्यात आली आहे. ‘समूह सफाई’साठी कामगारांना रस्ते नेमून देण्यात आले आहेत. या नव्या कल्पनेमुळे रस्त्यांची दुबार सफाई होत असून घरी पळणाऱ्या कामगारांनाही चाप बसला आहे.पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये १३५ लहान-मोठे रस्ते असून त्यांची स्वच्छता करण्यासाठी १०३ मुकादम आणि १५०७ सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मुकादमाच्या हाताखाली २० ते २५ कामगार दररोज या विभागात सफाईचे काम करतात. दररोज सकाळी ६.३० च्या सुमारास विभागातील चौक्यांवर हजेरी लावून कामगार कामाला निघून जातात. मात्र हजेरीच्या वेळी उपस्थिती सक्तीची असल्यामुळे सफाई कामगार धावतपळत सकाळी ६.३० वाजता चौकीवर पोहोचतात. पण दुपारी १ वाजेपर्यंत सेवा कार्यकाळ असतानाही ते सकाळी ११ नंतर घरी पळ काढत असल्याचे निदर्शनास आले होते. घरी लवकर पळणाऱ्या सफाई कामगारांची संख्या वाढत असल्यामुळे संपूर्ण मुंबईत ही समस्या प्रशासनाला डोकेदुखी बनली होती.लवकर घरी पळणाऱ्या कामगारांना रोखण्यासाठी ‘सी’ विभाग कार्यालयाच्या सहाय्यक अयुक्त संगीता हसनाळे यांनी तोडगा काढला आहे. हे कामगार सकाळी ७ च्या सुमारास सफाईस सुरुवात करतात. त्यांचे काम साधारण १०.०० ते १०.१५ वाजेपर्यंत पूर्ण होते. सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत त्यांना नाश्ता अथवा जेवणासाठी विश्रांती दिली जाते. त्यानंतर बरेच कामगार विभागातून गायब होत होते. त्यामुळे संगीता हसनाळे यांनी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ‘समुह सफाई’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मुकादमांना दररोज एका रस्त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हाताखालच्या कामगारांची प्रथम हजेरी घेऊन जबाबदारी असलेल्या रस्त्याची बारकाईने सफाई करण्याच्या कामाचा गेल्याच आठवडय़ात श्रीगणेशा करण्यात आला. या मोहिमेमुळे विभागातील सर्व रस्त्यांची दररोज दोन वेळा सफाई होऊ लागली आहे. रस्त्यालगत साचलेली धूळ, बारीक दगडगोटे, पर्जन्य जलवाहिन्यांच्या आसपास साचणारा कचरा आदींची सफाई सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत केली जात आहे. त्यामुळे या भागातील रस्ते लख्ख होऊ लागले असून कामगारांच्या लवकर घरी पळण्याच्या मनोवृत्तीलाही आळा बसला आहे.
घरी पळणाऱ्या कामगारांसाठी ‘समूह स्वच्छता’ मोहीम हाती घेऊन रस्ते स्वच्छतेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या योजनेमुळे विभाग स्वच्छ होऊ लागला असून कामगारांमध्येही शिस्त वाढू लागली आहे.
संगीता हसनाळे,साहाय्यक आयुक्त, ‘सी’ विभाग
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2015 रोजी प्रकाशित
महापालिकेची ‘समूह सफाई’ची सक्ती
कामावरून एक-दीड तास आधीच घरी पळणाऱ्या सफाई कामगारांना 'सी' विभाग कार्यालयाने चाप लावला आहे. विश्रांतीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा हजेरी घेऊन कामगारांना 'समूह सफाई' सक्तीची करण्यात आली आहे. 'समूह सफाई'साठी कामगारांना रस्ते नेमून देण्यात आले आहेत. या नव्या कल्पनेमुळे रस्त्यांची दुबार …

First published on: 19-08-2015 at 02:48 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc new project work together clean together