अवाजवी करवसुलीच्या विरोधात पारगमन कर नाक्यावर तोडफोड

महानगरपालिकेच्या पुणे रस्त्यावरील पारगमन कर नाक्याची आज सायंकाळी संतप्त लोकांनी तोडफोड केली तसेच कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना पळवून लावले, वाहनेही जाळली.

महानगरपालिकेच्या पुणे रस्त्यावरील पारगमन कर नाक्याची आज सायंकाळी संतप्त लोकांनी तोडफोड केली तसेच कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना पळवून लावले, वाहनेही जाळली. या नाक्यावर वाहनचालकांकडून अवाजवी कर वसूल केला जात असल्याच्या तक्रारी वारंवार आलेल्या आहेत.
या प्रकरणी हकिगत अशी, की या नाक्यावर एकनाथ शेलार या टेंपोचालकाकडे  कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी साठ रुपयांऐवजी १२० रु. मागितले. त्याने एवढे पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान आजूबाजूचे नागरिकही गोळा झाले. तोपर्यंत शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले हे शिवसैनिकांसह तेथे आले. कंत्राटदारांचे कर्मचाऱ्यांनी त्यांनाही दाद दिली नाही. त्यामुळे संतप्त लोकांनी नाक्याची मोडतोड केली. नंतर कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला. जमावाने त्यांची वाहने जाळली. कार्ले यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत कोतवाली व तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस तेथे आले परंतु हद्दीच्या वादांनी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यात अडचणी आल्या. टेम्पोचालकाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Broken toll naka against extra toll assessment