अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजा महागाईच्या तडाख्यात सापडल्या आहेत. इंधनास त्याची सर्वाधिक झळ बसली असल्याने अनेकांनी पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सौर ऊर्जेसह अन्य पर्यायांचा सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे. धुळे जिल्ह्य़ातील महिला आर्थिक विकास महामंडळाने घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या वाढत्या किमतींच्या पाश्र्वभूमीवर, गृहिणींना ‘कांडी कोळसा’ यंत्राचा अनोखा पर्याय उपलब्ध करून देत महागाईचे चटके कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
‘माविम’च्या वतीने शिरपूर तालुक्यातील खंबाडे, बुडखी व तरवाडे या गावी हा उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना सरपण गोळा करण्यासाठी नेहमीच पायपीट करावी लागते. एकीकडे होणारी पायपीट व दुसरीकडे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी माविमने एक कांडी कोळसाचा नवीन पर्याय शोधला आहे. कोळसा तयार करण्याची अगदी सोपी पद्धत विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी घरी किंवा शेतात जमा होणारा सुका कचरा, पेपर, झाडू -केरसुणीचे दाते, धांडे, झाडाची सुकलेली पाने, गवत आदी कोरडा कचरा साहित्याची गरज भासते. त्यातही कोळसा तयार करण्यासाठी आवश्यक भट्टी ही घरातील वापरातील दोन लोखंडी ड्रमपासून तयार करण्यात आली आहे. जमा झालेला कचरा ड्रममध्ये भरून त्यास साधारणत: १५ मिनिटे उष्णता द्यायची. यामुळे कचऱ्याचा रंग हा तांबूस होत असतानाच भट्टीतून तो कचरा एका मोकळ्या टोकरीत टाकायचा. टोकरीतील कचऱ्याची धग कमी झाल्यावर त्यामध्ये गहू, बाजरी किंवा ज्वारीचे १०० ग्रॅम पीठ टाकावे व त्यात गरजेपुरते पाणी टाकून ते संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यावे. कचऱ्याचे नव्याने तयार झालेले मिश्रण ‘कांडी कोळसा’ यंत्रात टाकले जाते. सिंगल फेजवर हे मशिन चालते. यासाठी फारशी वीजही खर्ची होत नाही. यंत्रास कोळशाची ‘डाय’ बसवून त्यात हे मिश्रण टाकले की, त्यातून निघणारा कोळसा काही वेळ वाळवून तो दैनंदिन वापरात आणला जाऊ शकतो. यामुळे झाडांची सरेआम होणारी कत्तलही वाचते. शिवाय महिलांनाही सरपणासाठी पायपीट करावी लागत नाही. या यंत्रासाठी सरकारकडून काहीअंशी अनुदानही दिले जाते.
धुळे माविमने कोल्हापूर येथून साधारणत: १२ हजार रुपयांना हे यंत्र विकत घेतले. मात्र, धुळे परिसरात येईपर्यंत वाहतूक व सर्व खर्च गृहित धरता त्यासाठी १८ हजार रुपये मोजावे लागले. आज या यंत्राचा उपयोग खंबाडे, बुडखी व ततवाडे गावातील अनेक महिला करत आहेत. यंत्रावर दिवसावार महिलांनी विभागणी करून प्रत्येकाला जमेल त्या वेळेनुसार त्यांचे कोळसा तयार करण्याचे काम सुरू असते.