समाजातील सर्वच क्षेत्रांत असलेल्या विषमतेचे उच्चाटन होण्यासाठी संवेदनशील मनाची गरज असते. म्हणूनच राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानात समतेचा पाया घातला. म्हणूनच आज देशात सामाजिक न्यायाची संकल्पना कार्यान्वित झाली आहे. त्याचे श्रेय छत्रपती शाहूमहाराजांनाच दिले जाते. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोकराजे ठरले, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी यांनी केले.
जिल्हा परिषद व समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांच्या १३९व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्यायदिनाचा कार्यक्रम  झाला. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. निशिगंधा माळी बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड, कृषी व फलोद्यान समितीचे सभापती जालिंदर लांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आदींची उपस्थिती होती. समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात १६ विद्यार्थिनींना प्रतीकात्मक स्वरूपात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती, तर पाच विद्यार्थ्यांना अपंग शिष्यवृत्ती तसेच अपंग क्रीडा स्पर्धेतील सहभागी व महात्मा फुले विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सात लाखांचे अनुदान वितरण करण्यात आले. याशिवाय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने १० विद्यार्थ्यांना ८ लाख, तर अपंग वित्त महामंडळातर्फे तीन लाभार्थ्यांना दोन लाख ८० हजारांचे अनुदान, रमाई घरकुल योजनेंतर्गत पाच लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी आदेश, २० टक्के सेस फंडातून पाच विद्यार्थ्यांना सायकल व थ्रीपिस्टन पंप वितरण याप्रमाणे विविध लाभ देण्यात आले. कन्यादान योजनेंतर्गत योजना राबविणाऱ्या लोकमंगल प्रतिष्ठान व डी. के. मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेला सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले. तर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड, महादेव पाटील, कल्पना निकंबे, सोलापूर महापालिकेच्या सदस्य रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती.