ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर परिसरात घरफोडय़ा करणारे चोर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून यापैकी काहींनी शासकीय कार्यालयांना लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल सहा ठिकाणी घरफोडय़ा झाल्या असून त्यामध्ये दोन शासकीय कार्यालये आहेत. कल्याण येथील महावितरण आणि शिधावाटप कार्यालयात चोरटय़ांनी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लुटून नेला आहे.

– घाटकोपर परिसरात राहणारे उदय पटेल यांचे नौपाडा परिसरात दुकान आहे. या दुकानात रविवारी रात्री दीड लाखांची चोरी झाली. दुकानाच्या पंखा बसविण्याच्या मोकळ्या जागेतून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला आणि केबिनमधून वायरचे बंडल असा एक लाख ५९ हजारांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील खारकर आळी परिसरात भवरलाल जैन राहत असून त्याचे कौसा येथील नशेमन कॉलनीत पलक नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे.रविवारी रात्री चोरटय़ांनी बाथरूमची खिडकी उचकटून आत प्रवेश करत ९५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

कल्याण-मुरबाड रोडवरील एलआयसीच्या कार्यालयात रविवारी रात्री २५ हजारांची चोरी झाली आहे. कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी लॅपटॉप, डीव्हीडी, रेकॉर्ड सिस्टम असा २५ हजारांचा ऐवज चोरून नेला, तर कल्याण येथील शिधावाटप कार्यालयातही चोरी झाली असून कार्यालयाची खिडकी उघडून त्यावाटे चोरटय़ांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातून सात हजारांची रोख रकम, रबरी शिक्के, महत्त्वाची कागदपत्रे आणि चाव्या चोरटय़ांनी चोरून नेल्या आहेत. या दोन्ही घटनेप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली म्हसोबानगर येथील महावितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर असून त्यातील तांब्याच्या तारा आणि ऑईल चोरटय़ांनी चोरून नेले आहे. एकूण ९० हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथील सेंच्युरी रेयॉन हॉस्पिटल परिसरात विजय फुलकर राहत असून त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी १५०० रुपये चोरले.