नुकसानभरपाईसाठी भोई बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
या जिल्ह्य़ात पाटबंधारे विभागांतर्गत येणारी जलाशये व जिल्हा परिषद अंतर्गत येणारे लहान-मोठे मालगुजारी तलाव मिळून ५ हजारावर तलाव आहेत. या जिल्ह्य़ातील ढिवर-भोई समाजाचा उदरनिर्वाह तलावांवर अवलंबून असतो. यावर्षी जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलाशये फुटून त्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांनी सोडलेले कोटय़वधींचे मत्स्यबीज वाहून गेले. या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली असून यासाठी १७ ऑगस्टला भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व भोई समाजबांधवांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.अमीत सनी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्य़ात एकूण १३७ मत्स्य व्यवसाय सेवा सहकारी संस्थेचे
६ हजारांवर सभासद असून त्यांचा उदरनिर्वाह मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. यासाठी ते तलाव लीजवर घेऊन त्यात मत्स्यबीज सोडून व्यवसाय करतात. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीने जलाशये तुडूंब भरली, तर बहुतांश जलाशये फुटल्याने त्यात मत्स्य संस्थांनी टाकलेले कोटय़वधींची मत्स्यबीजे वाहून गेली. मात्र, शासनाच्या १९ एप्रिल १९७६ च्या महसूल विभागाच्या आदेशानुसार नुकसान भरपाईची अट फक्त पाटबंधारे तलावांकरिता दिली आहे. याशिवाय, ६० सें.मी.च्या वर व सतत १२ तास पाऊस पडून मत्स्यबीज वाहून गेले तर हजार रुपयेप्रमाणे नुकसान देण्यात येते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मालगुजारी तलावांकरिता ही अट लागू नाही. त्यामुळे मासेमारी करणारा समाज सद्यस्थितीत कर्जबाजारी झाला असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
याकरिता शासन परिपत्रकात दुरुस्ती करून मासेमार संस्थांची तलावांची लीज माफ करण्यात यावी व वाहून गेलेल्या मत्स्यबिजांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली. यासह भोई समाजाच्या इतर समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे पदाधिकारी सावलराम मारबदे, वासुदेव खेडकर, परेश दुरूगवार, आसाराम मेश्राम, जयचंद नागरे, हिवराज बावणे, भाजप तालुकाध्यक्ष श्यामराव शिवणकर, दिलीप गभणे, देवीलाल झमके, जुगनू मौजे, जयचंद नागरे, संजय दुधबुरे, कालिदास बावणे, कचरू मेश्राम, बारकू भानारकर, नारायण वाघधरे, बाबुराव कोल्हे, हेमराज मेश्राम आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.अमित सनी यांना निवेदन देण्यात आले.

‘सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा’
सालेकसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे, तर तालुक्यातील शेकडो हेक्टर धानपिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पीडितांना तातडीने शासनातर्फे मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी सभापती राकेश शर्मा यांनी केली आहे.
पावसाने चारदा फटकाही बसल्याने तालुक्यात घर व गोठे पडून नागरिकांचे मोठे आíथक नुकसान झाले आहे, तर जनावरांच्या मृत्यूसोबत एक इसम पुरात वाहून गेला. तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो एकर शेतातील पेरणी पाण्याखाली बुडाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील पूरस्थिती अद्यापही ओसरली नसून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व पीडितांना तातडीने आíथक मदत द्यावी, अशी मागणी राकेश शर्मा यांनी केली आहे.