पतसंस्था स्थापन करण्यापूर्वी जे संस्था चालक सायकलवरून फिरत असत ते आज करोडपती झाले असून ठेवीदार मात्र रस्त्यावर आले आहेत, असा आरोप करून आपल्या ठेवी परत मिळाव्या यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील हजारो ठेवीदार १२ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार आहेत. महाराष्ट्र ठेवीदार तथा हितसंवर्धन समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. नारायण कटेकर यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो ठेवीदारांच्या उपस्थितीत येथे झालेल्या मेळाव्यात हा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ठेवीदारांचे प्रश्न मांडण्यात येणार असल्याची माहिती कटेकर यांनी दिली. जिल्ह्य़ासह राज्यातील बहुतेक पतसंस्था चालकांनी सेवानिवृत्त वृद्ध, आजारी, विधवा ठेवीदारांची अक्षरश: लूटमार केली आहे. आपले हक्काचे पैसे आता त्यांना मिळत नाहीत. ठेवीदारांच्या पैशांवर संस्था चालकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. सर्वसामान्य ठेवीदारांना हलाखीचे जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या अशा पतसंस्था चालकांना शिक्षा झालीच पाहिजे, जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि लेखा परीक्षकांनी मंजूर केलेल्या प्रस्तावांचा निधी त्वरित मिळालाच पाहिजे, अडचणीतील पतसंस्था संचालकांना अटक करण्यात यावी, पतसंस्था चालकांवर कर्जाचा बोजा निश्चित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, नागरी बँकांप्रमाणे ठेवीदारांना विमा संरक्षण मिळावे अशा मागण्या ठेवीदार हितसंवर्धन समितीने केल्या आहेत. शासनाने या मागण्या गांभिर्याने घेऊन मंजूर कराव्यात अन्यथा थेट काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांकडे लक्ष देण्यासंदर्भात साकडे घालण्यात येईल असे समितीने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2013 रोजी प्रकाशित
मंत्रालयावर धडक देण्याचा ठेवीदारांचा इशारा
पतसंस्था स्थापन करण्यापूर्वी जे संस्था चालक सायकलवरून फिरत असत ते आज करोडपती झाले असून ठेवीदार
First published on: 23-10-2013 at 07:23 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depositors set to march on mantralaya