वेगळा विदर्भ व इतर मागण्यांसाठी जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नुकतेच रेल्वे स्थानकावर धरणे दिले. स्वतंत्र विदर्भाच्या घोषणेने हा परिसर दणाणून गेला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकच्या कार्यकर्त्यांनी  मानस चौकातील सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाला अभिवादन केले.
त्यानंतर जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते घोषणा देत टेकडीच्या गणेश मंदिरात गेले. तेथून ते रेल्वे स्थानकावर गेले. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील दारातून ते आत शिरत होते. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तसेच रेल्वे पोलिसांनी त्यांना अडविले. रेल्वे रोको आंदोलन करण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून धरले.
जांबुवंतराव धोटे यांनी इतर रेल्वे प्रवाशांना त्रास नको म्हणून समोरच्या वऱ्हांडय़ात त्यांनी सत्याग्रह सुरू केला. स्वतंत्र विदर्भ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्मारक व्हावे, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती देशप्रेम दिन म्हणून साजरा करावा आदी मागण्यांसाठी हा सत्याग्रह होता. कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाही दिल्या. या आंदोलनात काही तृतीयपंथीही सहभागी झाले होते. तासभर सत्याग्रह केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.