दारापुढील रांगोळीला मिणमिणत्या प्रकाशाने उजळवणाऱ्या रंगबेरंगी पणत्यांचा दिमाख सध्या वाढला आहे. दीपावलीनिमित्त बाजारपेठा सध्या विविध आकारातील तसेच प्रकारातील पणत्या, दिव्यांनी सजल्या आहेत. प्रथमच उपचार पध्दतीशी सांगड घालत एक विशिष्ट प्रकारचा दिवा बाजारात दाखल झाला असून यामुळे ताणतणाव हलके होण्यास मदत होईल असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या शिवाय पाण्यातील तरंगत्या दिव्याची ‘क्रेझ’ अद्याप कायम आहे.फटाक्यांची आतषबाजी आणि आकाश दिव्यांचा झगमगाट याबरोबर अंगणातील पणतींचा मिणमिणता प्रकाश प्रकाशपर्वाला वेगळा आयाम प्राप्त करून देतो. दीपावलीत रांगोळी तसेच घरातील आरासीमध्ये या पणत्यांना विशेष महत्व आहे. ही बाब लक्षात घेऊन बाजारात साध्या मातीच्या पणती बरोबरच स्वस्तीक, शंख, फुले, कुयरी, चौकोणी, तुळशी वृंदावन, नारळ, घर, पंचारती अशा विविध आकारातील पणत्या दाखल झाल्या आहेत. मातीच्या पणत्यांना रंग देण्यासोबत कुंदन, टिकली तसेच गोल्डन वर्क केल्याने या पणत्याचे दर सध्या वधारले आहे. साध्या पणत्या २० ते ३० रुपये डझनापासून उपलब्ध असून त्यापुढील नक्षीकामासाठी प्रती नग १० ते ४५ रुपये अशा दराने जादा दाम मोजावा लागत आहे. यंदा प्रथमच दिव्यांच्या पंक्तीत अॅरोमा थेरपीवर आधारीत खास दिवा बाजारात आला आहे. चिनीमातीच्या शोभेच्या वस्तूत हा दिवा लावला जातो. तो दिवा जसा तापेल, त्यामुळे वस्तुचे तापमान वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे आतील विशिष्ट सुगंधी औषधी संपुर्ण वातावरणात मिसळते. या सुहासाने मनावरील ताणतणाव हलका होतो असा विक्रेत्यांचा दावा आहे. या खास दिव्यासाठी ग्राहकांना साधारणत ५०० रुपये मोजावे लागणार आहे. या व्यतिरिक्त पणत्यांना आधुनिकतेचा साज देत पारदर्शी अशा प्लास्टिक पणत्याही बाजारात दाखल झाल्या आहे.
पारदर्शीपणा तसेच प्लास्टिक यामुळे ग्राहकांची त्यांना विशेष मागणी आहे. साधारणत ५० रुपये डझनने त्यांची विक्री होत आहे. या प्लास्टिक पणत्याचा आधार घेत नारळाच्या झाडाखाली त्यांची तरंगत्या पध्दतीने खास व्यवस्था करण्यात आली आहे. २५० रुपयांसाठी ग्राहकांना मोजावे लागत आहे. पणत्याचे दर मागील वर्षांच्या तुलनेत काही अंशी वाढले असून त्याचा विक्रीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2014 रोजी प्रकाशित
दिवाळीतील पणत्यांना आधुनिक साज
दारापुढील रांगोळीला मिणमिणत्या प्रकाशाने उजळवणाऱ्या रंगबेरंगी पणत्यांचा दिमाख सध्या वाढला आहे. दीपावलीनिमित्त बाजारपेठा सध्या विविध आकारातील तसेच प्रकारातील पणत्या, दिव्यांनी सजल्या आहेत.

First published on: 17-10-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different size and type lamp light enter in the market on diwali occasion