दिवा- सावंतवाडी पॅसेंजरच्या रविवारच्या अपघातामध्ये अनेकजणांनी जवळच्या माणसांना गमावले आहे. पनवेलचे नखते कुटुंबीय त्यापैकी एक आहे. पनवेलमधील राहणारे जयराम नखते यांच्या कुटुंबाची या अपघातामध्ये पूर्णपणे वाताहात झाली आहे. मेहुण्याच्या लग्नासाठी माणगावजवळील खरसई गावाकडे कुटुंबासह निघालेल्या नखते कुटुंबावर काळाने घाला घातला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून जयराम आणि त्यांच्या तीन मुली गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेलमधील उसर्ली गावामध्ये जयराम हे पत्नी सुरेखा आणि जान्हवी, समृद्ध, मानस्वी या तीन चिमुरडय़ा मुलींसह राहत होते. जयराम यांचा पेस्टकँट्रोल व्यवसाय. त्यांच्या पत्नी सुरेखा यांचा भाऊ प्रदीप शितकर यांचे ८ मे रोजी लग्न आणि ५ मे रोजी साखरपुडा होता. यासाठी रविवारी मिळेल ती गाडी पकडून गावी जायचे एकमेव ध्येय ठेवून नखते कुटुंबीयांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर फुल्ल असूनही पकडली. मात्र सकाळी दहा वाजता माणगाव रेल्वेस्थानकात पोहचण्या अगोदर काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या अपघातामध्ये जयराम यांच्या पत्नी सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला. जयराम हे जबर जखमी होऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना मुंबई सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलींमधील ४ वर्षांची जान्हवीला या अपघातात डोक्याला दुखापत झाल्याने तिला रोहा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अडीच वर्षांची समृद्धीला पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सोमवारी सकाळी डॉक्टरांनी तिचा पाय न कापल्यास तीला संसर्ग होण्याची शक्यता वर्तविल्याने, अखेर नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करण्यास संमती दिली.
दोन महिन्यांची मनस्वी हीलासुद्धा मार लागला आहे. अर्धा तासात दिवा-सावंतवाडी पॅसेंजर माणगाव स्टेशनात पोहचणार होती. मात्र काळ आणि वेळेचा मेळ बसला आणि अपघाताने बहीण हिरावल्याचे प्रदीप शितकर यांनी सांगितले. सोमवारचा होणारा प्रदीपचा साखरपुडा रद्द करण्यात आला. खरसई वाडीवर एकच शोककळा पसरली. जयराम यांना सोमवारी दुपारी शुद्ध आली. ते आजही मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. जान्हवीला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र येथील खासगी वैद्यकीय यंत्रणेने अशावेळीसुद्धा जान्हवीचे मामा पांडुरंग कांबळे यांच्याकडे अगोदर रक्कम भरा नंतर उपचार हा नेहमीचा हक्काचा मारा केला.
कोणताही राजकीय किंवा सरकारी आधार मिळाला नसल्याची खंत त्यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. ही कसली माणुसकी आणि हा कसला वैद्यसेवेकीचा धर्म असा प्रश्न कांबळे यांना यावेळी पडला आहे. प्रसारमाध्यमांमधून कळणारी मदत जान्हवीपर्यंत पोहचली नसल्याचे त्यांनी सांगीतले.
मनस्वीकडे रोहा येथील रुग्णालयात जयराम यांच्या नातेवाईकांनी धाव घेतली. आईच्या दुधाच्या ओढीवर जगणाऱ्या मनस्वीचे यापुढील जीवनप्रवास दिवा सावंतवाडीच्या अपघाताने बदलला आहे. या अपघातामधील जयराम यांची प्रकृती अजूनही पूर्ववत होण्यासाठी अनेक दिवस जातील. मात्र या अपघाताने तीन मुलीं आईच्या मायेला कायमच्या मुकल्या आहेत. खासगी वैद्यकीय व्यवस्थेमध्ये माणुसकी जिवंत आहे का? काळाने नखते कुटुंबीयांवर घाला घातला. मात्र सरकारी कामांची अनास्थेमुळे २४ तास उलटून गेले तरीही जान्हवीला वाशी एमजीएम रुग्णालयात रेल्वे प्रशासन किंवा राज्य सरकारची मदत पोहचली नाही. जान्हवीला वैद्यकीय उपचार सुरू करताना पैसे आहेत, का जान्हवीच्या मामाला एमजीएम प्रशासनाने विचारलेला प्रश्न सध्याच्या खासगी वैद्यकीय व्यवस्थेमध्ये माणुसकी जिवंत आहे का, हा प्रश्न उभा करत आहे.