पूर्व मुक्तमार्ग बिनखड्डय़ांचा, गुळगुळीत होणार

पूर्व मुक्तमार्ग दर्जेदार व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून डांबरीकरण वेळेत संपवण्याबरोबरच ‘पॉलिमर मॉडिफाइड बीटुमन’ हे विशेष मिश्रण या रस्त्यासाठी वापरण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता टणक होऊन खड्डे पडणार नाहीत.

पूर्व मुक्तमार्ग दर्जेदार व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून डांबरीकरण वेळेत संपवण्याबरोबरच ‘पॉलिमर मॉडिफाइड बीटुमन’ हे विशेष मिश्रण या रस्त्यासाठी वापरण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता टणक होऊन खड्डे पडणार नाहीत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन वर्षांपूर्वी पावसाळा सुरू होताना लालबागच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते केले. त्यानंतर आठवडाभरात त्यावर खड्डे पडले आणि कामाच्या दर्जावरून टीकेची झोड उठली. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने पूर्व मुक्त मार्गासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसापूर्वी दोन आठवडे तरी पूर्ण होणे अपेक्षित असते. हे लक्षात घेऊन डांबरीकरणाचे काम संपवण्यात आले आहे.
त्याचबरोबर या प्रकल्पासाठी ‘पॉलिमर मॉडिफाइड बीटुमन’ हे विशेष मिश्रण वापरण्यात आले आहे. नेहमीच्या डांबरापेक्षा हे मिश्रण अधिक दर्जेदार असते. याचा वापर केल्याने रस्त्याचा पृष्ठभाग चांगला राहतो आणि गाडय़ा घसरत नाहीत. शिवाय सहजासहजी खड्डेही पडत नाहीत.
 वांद्रे-वरळी सागरी सेतूवर हेच मिश्रण वापरण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील आणि उड्डाणपुलांवरील खड्डय़ांची चर्चा होत असताना सागरी सेतूवरील रस्ता मात्र चांगला होता. तोच अनुभव लक्षात घेऊन तज्ज्ञ अभियंत्यांनी  ‘पॉलिमर मॉडिफाइड बीटुमन’ मिश्रण वापरण्याचा निर्णय घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eastern free way will be pothole free and smooth