विविध विकासकामांच्या शुभारंभानिमित्ताने जिल्ह्य़ातील भोकरदन येथे आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर जाहीर हल्लाबोल केला. ‘नवी दिल्लीत गेल्यावर शरद पवार यांच्या मागे-पुढे खुशामत करीत फिरणारे आणि गल्लीत आल्यावर राष्ट्रवादीवर टीका करणारे खासदार दानवे हे दुटप्पी आहेत,’ असे सांगून अजित पवार यांनी त्यांची ‘गांडूळ’ म्हणून संभावना केली.
राष्ट्रवादीचे अंकुशराव टोपे अध्यक्ष असलेला जिल्ह्य़ातील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला १ हजार ९०० रुपये, तर दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना १ हजार ४०० रुपये भाव देतो. असे सांगून पवार म्हणाले, की या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. रामेश्वर कारखान्याने काळ्या बाजारात साखर विकल्याने गुन्हा दाखल करावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते, याची आठवणही या वेळी पवार यांनी करून दिली.
राज्यातील ४० सहकारी साखर कारखाने विक्रीच्या निमित्ताने विरोधक राष्ट्रवादीवर अकारण आरोप करीत असल्याचे सांगून पवार म्हणाले, की विरोधकांना कशातही भ्रष्टाचार दिसतो. भाजपच्या काही नेत्यांना सहकारी साखर कारखाने चांगले चालवता आले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्य़ातील जनतेने वीजबिल वेळेवर भरल्यास जिल्हा भारनियमनातून मुक्त होऊ शकेल. जिल्ह्य़ातील विद्युत कामांसाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही. राजूर गणपती येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी बृहत्आराखडा सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे पिके हातची गेलेल्या शेतक ऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निकषात बसत नसतानाही ९२२ कोटींचे अर्थसाह्य़ जाहीर केले. केंद्राचे पैसे आले नसले तरी आपण प्रयत्न करून राज्याच्या तिजोरीतून ५०० कोटी या साठी वर्ग केले आहेत.
जालना-भोकरदन-सिल्लोड रस्त्याचे बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यास आपण प्रयत्न करू, असेही पवार म्हणाले. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणास धक्का लावल्याशिवाय मराठा समाजास आरक्षण देण्याची आपली भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री राजेश टोपे, आमदार चंद्रकांत दानवे यांचीही भाषणे झाली. अंकुशराव टोपे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरविंदराव चव्हाण यांची उपस्थिती होती.
गर्दी आणि टीका
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील वचनपूर्ती यात्रेचा प्रारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत भोकरदन येथे झाला होता. त्या वेळच्या जाहीर सभेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या सभेस मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे आघाडीत जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असूनही मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपचे खासदार दानवे यांच्यावर टीका झाली नव्हती. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भाजप खासदारावर आक्रमक टीका करण्यात आली.                                                                                                        नराधमांचे अवयव कापण्याचा अजित पवारांचा अफलातून सल्ला
हाताच्या बोटाची कात्री करुन बलात्कार करणाऱ्या नराधमाचे काय कापायला हवे, हे तुम्हाला समजलेच असेल, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. सोमवारी जालना येथे आयोजित जाहिर सभेत बोलताना ते म्हणाले की, असे नराधम जन्मालाच आले नाही पाहिजेत, यासाठी पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत. प्रत्येक स्त्रीकडे त्याने आईच्या आणि बहिणीच्या नजरेने पाहावे असे संस्कार करण्याची गरज आहे. यातूनही एकाखा नालायक जन्मलाच तर त्याचे कापूनच टाकायला हवे. हे सांगताना, त्यांनी दोन बोटांची कात्री करुन दाखवली. पुढे ते असेही म्हणाले की, काय कापायचे हे तुम्हाला समजलेच असेल. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाण्याच्या अनुषंगानेही असेच विधान केले होते.