पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची कोणतीच शक्यता नसल्याने पक्षातून बाहेर पडलेल्या आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवराम झोले यांच्यामुळे शिवसेनेची जणू काही इगतपुरी मतदारसंघातील उमेदवारीची चिंताच मिटली.
तालुक्याच्या राजकारणात गुरुवारी विशेष उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी, शरद पवार यांचे समर्थक व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेच्या डेऱ्यात प्रवेश केला. शेकडो समर्थक व राष्ट्रवादीच्या ५० कार्यकर्त्यांसह झोले यांनी मुंबई येथे ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. झोले यांचा पक्षत्याग राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून शिवराम झोले हे शरद पवार यांचे निष्ठावंत समजले जातात. तब्बल दोन वेळा इगतपुरीमधून आमदार झालेल्या झोले यांच्या रूपाने शिवसेनेला एक मातब्बर आणि अभ्यासू राजकारणी मिळाला आहे.
झोले यांना शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असा विश्वास उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी यांनी व्यक्त केला आहे
मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झोले यांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सूर्यकांत महाडिक, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे, उपजिल्हाप्रमुख कुलदीप चौधरी, मदन चोरडिया, नगराध्यश्र संजय इंदुलकर आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.