रुसलेल्या त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी बुधवारी ललित पंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी त्र्यंबोली टेकडीवर प्रथेप्रमाणे लवाजम्यासह पोहोचली. महालक्ष्मी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा भाविकांच्या उदंड गर्दीत, उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडला. मिरवणुकीचा मार्ग रांगोळी, फुलांच्या पायघडय़ांनी सजविण्यात आला होता. कुष्मांड विधी पार पडल्यानंतर कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी भाविकांच्या रेटारेटीमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
ललित पंचमीच्या दिवशी अंबाबाईची पालखी शहराच्या पूर्वेस असलेल्या टेंबलाई मंदिरात जाते. त्र्यंबोली देवीने कोल्हासूरपुत्र कामाक्ष याचा वध केला होता. यानंतर झालेल्या विजयोत्सवावेळी अंबाबाईस त्र्यंबोली देवीस निमंत्रण द्यायचा विसर पडला होता. रागावलेली त्र्यंबोली देवीस नंतर अंबाबाईने निमंत्रण दिले. पण ती आली नाही. त्र्यंबोलीचा राग शमन करण्यासाठी अखेर महालक्ष्मी आपल्या लवाजम्यासह टेकडीवर गेली. तेथे तिच्या समक्ष कामाक्ष वधाचा प्रतिकात्मक सोहळा (कुष्मांड छेदन) करण्यात आला. हाच सोहळा आज महालक्ष्मी-त्र्यंबोली देवीच्या भाविकांनी साजरा केला.
सकाळी दहा वाजता तोफेची सलामी झाल्यानंतर अंबाबाईची उत्सव मूर्ती पालखीतून त्र्यंबोलीच्या भेटीला निघाली. पालखी मार्गावर अत्याकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. पालखी मार्गावर फुलांच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. पारंपरिक पध्दतीने पारंपरिक वाद्यांसह संपूर्ण ताफ्यासह पालखी या मार्गाने मार्गस्थ झाली. भवानी मंडप, िबदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज टाकाळा माग्रे पालखी टेंबलाई येथे आली. शाहू मिलजवळ उत्सव मूर्तीचे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. पालखी मार्गावर प्रसाद, पिण्याचे पाणी याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर आली तेव्हा भाविकांनी अंबा की जय बोलो, दुर्गा की जय बोलो असा गजर सुरू केला. अंबाबाईच्या पालखीबरोबर तुळजाभवानी व छत्रपती शिवरायांचीही पालखी सोबत होती. त्र्यंबोली देवी व महालक्ष्मी देवीची भेट झाल्यानंतर आरती करण्यात आली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते त्र्यंबोली देवीची पूजा करण्यात आली. कु. आर्या विक्रम गुरव हिने परंपरेप्रमाणे कुष्मांडाचे पुजन केले. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळारूपी कामाक्षाचा कुष्मांड विधी संपन्न झाला. फोडलेला कोहळा घरी नेण्याने ऐश्वर्य येते अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. त्यातून रेटारेटी सुरू झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या विधीनंतर अंबाबाईची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिर प्रदक्षिणेनंतर देवीला गरुड मंडपात बसविण्यात आले. तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सव मूर्ती पुन्हा गाभाऱ्यात बसवण्यात आली.