जिल्हय़ात यंदा पाऊस लांबल्यामुळे व जमिनीतील ओलावा वाढल्यामुळे रब्बी हंगामाच्या क्षेत्रात दीडपटीने वाढ झाली आहे. अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होत आहे. जिल्हय़ात रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी १ लाख ७० हजार हेक्टर असते.
या वर्षी सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा असून तो ५० टक्क्यांच्या आसपास आहे. त्याखालोखाल गहू, ज्वारी, करडई व सूर्यफुलाचे क्षेत्र आहे. सलग पावसामुळे उदगीर, अहमदपूर, जळकोट, चाकूर आदी तालुक्यांतील खरीप पिकांना फटका बसला. ही कसर रब्बी हंगामात भरून निघावी, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. रब्बी हंगामाची साथ चांगली मिळाली तर उत्पादनात चांगली वाढ होईल, असा अंदाज आहे.