कल्याण-डोंबिवली पालिकेचा वाहन विभाग आणि मे. हरदीप रोडवेजचे खासगी वाहतूकदार यांच्या मधील ‘टी’ परमिट वाहनांचा गैरप्रकार ‘लोकसत्ता’ने उघड केला आहे. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन उपप्रादेशिक परिवहनच्या कल्याण विभागाने (आरटीओ) खासगी वाहतूकदार बाबा तिवारी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेतील वाहन विभागाचे तत्कालीन आणि विद्यमान उपायुक्त यांच्या आशीर्वादाने वाहन विभागात नगरसेवक, त्यांचे पाठीराखे आणि काही पत्रकारांची वाहने पालिका कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. ही वाहने ‘आरटीओ’चा ‘टी’ परवाना न घेता वापरण्यात येत असल्याची माहिती हाती आली होती. यामुळे ‘आरटीओ’चा दरवर्षीचा लाखो रुपयांचा महसूल खासगी वाहतूकदार बुडवत असल्याचे उघड झाले होते. मे. हरदीप रोडवेजचे बाबा तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेला कर्मचारी वाहतुकीसाठी वाहने व पाणीपुरवठय़ासाठी टँकर पुरवठा करतात. आणखी डोंबिवलीतील खासगी वाहतूकदाराची माहिती देण्यास वाहन विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. कल्याणचे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी सांगितले, कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वाहन विभागाकडून पत्र मिळाले आहे. या पत्रात वाहने पुरवणारा ठेकेदार बाबा तिवारी यांनी ‘टी’ परमिट नसलेली वाहने कराराप्रमाणे पालिकेला पुरवली नाहीत असे स्पष्ट कळवले आहे. ही बाब अलीकडे निदर्शनास आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्राप्रमाणे हरदीप रोडवेजचे बाबा तिवारी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेला बाबा तिवारी यांनी कधीच्या कराराप्रमाणे वाहने पुरवली. त्यामध्ये टी परमिट नसलेली वाहने किती होती. याची र्सवकष माहिती घेऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.