मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न टांगणीला असतानाच स्वतंत्र मनमाड तालुका निर्मितीचे स्वप्न नव्या वर्षांत साकार होईल का, याविषयी चर्चा झडू लागली आहे. मनमाडकर तब्बल ३० वर्षांपासून मनमाड हा तालुका होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
दरवेळी नव्या जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू होताच मनमाड तालुकाही अस्तित्वात येईल अशी आशा नागरिकांना वाटत असते. नव्या तालुका निर्मितीसाठी संपूर्ण राज्यात मनमाड शहर हे प्रथम क्रमांकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. राज्यात ठाणे जिल्हा विभाजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच पुन्हा मालेगाव जिल्हा निर्मितीच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्य़ाबरोबरच नव्या तालुक्याच्या निर्मितीचे संकेत आहेत. मनमाड तालुक्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल भौगोलिक रचना, पाहणी अहवाल अनेक वेळा राज्य सरकारकडे देण्यात आलेले आहेत. तालुका निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. मध्यंतरी शासनाने प्रशासकीय दृष्टीने दोन तालुक्यांसाठी एक प्रांत कार्यालय असे धोरण निश्चित केले होते. त्यात येवला व नांदगावसाठी मनमाड येथे प्रांत कार्यालय मंजूर करण्यात आले. त्यासाठी हरकतीही मागविण्यात आल्या. परंतु त्यानंतर प्रांत कार्यालयाचे काय झाले, ते समजू शकले नाही.